महायुतीच्या सगळ्या ‘दांड्या’ व्यवस्थित आहेत. तुम्ही उगाच काळजी करू नका. आता विरोधकांची ‘दांडी’ कशी उडवायची ते आम्ही बघतो असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
दोन दिवसांपूर्वी कराड येथे झालेल्या महायुतीच्या मेळाव्याला अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी दांडी मारली होती. त्याबाबत माध्यमांनी छेडले असता उदयनराजेंनी वरील प्रमाणे उत्तर दिले.
कराड येथे बुधवारी सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ.अतुल भोसले, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, अँड.भरत पाटील, सुनील काटकर, राजेंद्र यादव, पैलवान धनाजी पाटील, एकनाथ बागडी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जरंडेश्वर साखर कारखाना आपण खाजगी होऊ देणार नाही अशी गर्जना केली होती? त्याकडे लक्ष वेधले असता खासदार भोसले म्हणाले, काँग्रेसच्या काळात खिरापत वाटल्यासारखे साखर कारखाने वाटले गेले. त्यामुळे ऊस काळपाचा व अनेक प्रश्न कारखानदारांच्या समोर उभे होते. त्यातून व्यवस्थापन कोलमडले.
परिणामी असे कारखाने खाजगी झाले. त्यापैकी जरंडेश्वर हा एक आहे हे तुम्ही समजून घ्या. लोकसभा निवडणुकीसाठी व प्रचारासाठी आता वेळ थोडा आहे. मतदारसंघ मोठा आहे सुमारे २ हजार ३०० गावे अन नगरपालिका, नगरपंचायती यांचा मतदारसंघात समावेश आहे.
त्यामुळे कमी वेळेत सर्व मतदारांच्या पर्यंत पोहोचणे अवघड बनले आहे. पण केंद्र सरकारचे काम घराघरापर्यंत पोहोचले असून विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार असल्याचे खासदार भोसले म्हणाले.
भाजपा संविधान विरोधी वाटतो का? याबाबत विचारले असता असं कोण म्हणतंय? असा प्रश्न त्यांनीच केला. तसेच भाजपचे काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी मिळते जुळते आहे असे सांगत भाजप हा जातीवादी पक्ष नाही असेही खासदार भोसले यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
होय मी उमेदवार म्हणूनच बोलतोय !तुमचा आजचा माध्यमांशी होत असणारा संवाद हा भाजपचे नेते, राज्यसभा खासदार की लोकसभा उमेदवार म्हणून होत आहे? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी सुरुवातीलाच खासदार भोसले यांना केला.
त्यावर क्षणभर थांबून ‘होय मी उमेदवार म्हणूनच बोलतोय!’ असे ते म्हणाले. त्यावर भाजपच्या १० उमेदवारी याद्या जाहीर झाल्या पण तुमचं नाव त्यात दिसत नाही. याकडे लक्ष वेधले असता ‘पक्ष मोठा आहे.
उशीर झाला असला तरी नाव लवकरच जाहीर करेल असेच त्यांनी सांगितले. पण जर उमेदवारी मिळालीच नाही तर बंडखोरी करणार का? असा प्रश्न करताच उमेदवारी मिळणार नाही असं तुम्हाला कोणी सांगितलं? असा प्रतिप्रश्न खासदार भोसले यांनी यावेळी केला.