थेट पाईपलाईन योजनेमध्ये काही तरी गौडबंगाल दिसत असून, यातील सत्य लोकांसमोर आणण्यासाठी या योजनेच्या चौकशीकरिता केंद्रीय समिती स्थापन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व संबंधित खात्यांच्या मंत्र्यांकडे मागणी करण्यात येईल, असे खा. धनंजय महाडिक यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या योजनेची श्वेतपत्रिका काढून जनतेसमोर मांडण्याची मागणी त्यांनी केली. योजनेचे उद्घाटन झाल्यामुळे कामाची पाहणी करण्यासाठी आलो आहे. येथील स्थिती पाहिल्यानंतर श्रेय घेण्यासाठी थेट पाईपलाईनच्या पहिल्या पाण्याच्या आंघोळीचा माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलेला प्रकार बालिश असल्याचे दिसून आले, असेही ते म्हणाले.
खा. महाडिक यांनी पुईखडी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पास भेट दिली. सुरुवातीला त्यांनी कार्यकारी अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्याकडून माहिती घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव उपस्थित होते. पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना महाडिक म्हणाले, थेट पाईपलाईनचे काम पूर्ण होण्यास 13 वर्षे लागली.
अभ्यंग स्नान करून ही योजना पूर्ण झाल्याचे माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले होते, तरीदेखील शहरात पाण्याची वानवा जाणवू लागली आहे. लोकांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. महिला घागरी घेऊन पाण्यासाठी रस्त्यावर उतरू लागल्या आहेत. याची कारणे शोधण्यासाठी व झालेल्या कामाची माहिती घेण्यासाठी आपण आज येथे भेट दिली.
या ठिकाणी काही धक्कादायक माहिती समोर आली. संपूर्ण शहरात अद्याप वितरण व्यवस्थाच पूर्ण झाली नसताना, माजी पालकमंत्र्यांनी उद्घाटनाची घाई का केली? एकटे येऊन आंघोळ करत लोकांची दिशाभूल का केली, असे सवाल त्यांनी केले.
थेट पाईपलाईन योजना सुरू झाली म्हणून संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करणारी शिंगणापूर योजना बंद केली. कारण, एकावेळी दोन्ही योजना चालू शकत नाहीत. अमृत योजना पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याशिवाय थेट पाईपलाईनचे पाणी मिळणार नाही. अमृत योजनेतून 12 टाक्या बांधावयाच्या होत्या. त्यापैकी केवळ चार टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे.
अजून आठ टाक्या बांधणे बाकी आहे. टाकीपर्यंत पाणी पोहोचविण्याची कोणतीही व्यवस्था नाही, असे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात शास्त्रीय पद्धत न वापरता केवळ चर खोदून पाईप टाकण्यात आल्या आहेत. यासाठी वापरलेल्या पाईपदेखील स्पायरल नसल्याचे सांगितले जाते.
त्यामुळे याची त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी करावी, अशी मागणी आपण केंद्रीय नेतृत्वाकडे करणार असल्याचे महाडिक म्हणाले. यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम, आशिष ढवळे, प्रदीप उलपे, मनीषा कुंभार, संजय सावंत, विजय देसाई, विशाल शिराळकर, किरण नकाते, वैभव माने आदी उपस्थित होते.
श्रेय घेण्यासाठी शहरात वितरण व्यवस्था नसतानाही एकट्यानेच आंघोळ करून माजी पालकमंत्र्यांनी लोकांच्या डोळ्यांत धूळ फेक केली आहे. सत्तेतील घटक पक्षांच्या नेत्यांनादेखील त्यांनी बोलावले नाही. त्यामुळे सत्तेत असणार्या शिवसेेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यावेळी नाराजी व्यक्त केली होती, असेही महाडिक म्हणाले.