दिल्ली येथून विमानाने पुण्यात येऊन घरफोडी करणार्‍या दोघांना अटक

Photo of author

By Sandhya

घरफोडी

दिल्ली येथून विमानाने पुण्यात येऊन घरफोडी करणार्‍या दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून एक लाख साठ हजारांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. एक आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

रिझवान अजमत अली (32, रा. लिबासपूर, दिल्ली), ईकरार नसीर अहमद (27, रा. उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका व्यावसायिकाने फिर्याद दिलेली आहे.

फिर्यादी हे कोंढव्यातील क्रांती चौक परिसरात राहण्यास आहेत. 13 जुलै रोजी त्यांच्या राहत्या घरातून आरोपींनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम चोरून नेली. याबाबत कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

गुन्ह्याचा तपास करीत असताना गोकूळनगर भागात दोघे संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. तसेच, ते वॉचमन नसलेल्या सोसायट्यांमध्ये जाऊन पाहणी करीत असल्याचे समजले.

त्यानुसार पोलिसांच्या पथकाने रिझवान आणि ईकरार यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींनी चोरीचा मुद्देमाल दिल्ली येथे ठेवला होता.

पोलिसांनी दिल्ली येथून सोन्याच्या दागिन्यांसह एक लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अटक करण्यात आलेल्यांमधील आरोपी रिझवान हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

Leave a Comment