सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरच्या चौकातील उड्डाणपूल कामाचा आज अजित पवार घेणार आढावा

Photo of author

By Sandhya

आज अजित पवार घेणार आढावा

पुणे महानगर विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरच्या चौकातील उड्डाणपूल पाडण्यात आला. त्या ठिकाणी दुमजली उड्डाणपूल प्रस्तावित आहे.

या कामाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे शनिवारी सकाळी बैठक आयोजित करण्यात आली आहे.

उड्डाणपूल जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना यापूर्वीच पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (पुम्टा) बैठकीत देण्यात आल्या होत्या. मात्र, या चौकातील जलवाहिनी हलविण्याचे महापालिकेकडून वेळेत झाले नाही.

त्यामुळे पुलाचे काम सुरू केल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. म्हणून पोलिसांनी गणेशखिंड रस्त्यावर बॅरिकेडिंग करण्यास पीएमआरडीएला परवानगी दिलेली नव्हती.

त्यामुळे या चौकातील काम सुरू झाले नाही. जी-20 परिषद, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांच्या पुणे दौर्‍यामुळे या कामात खंड पडला आहे. पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासाठी स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाची बैठक झाली. त्यात या प्रकल्पाचाही आढावा घेण्यात आला. त्यामध्ये स्वतंत्र बैठक घेण्याची ग्वाही पवार यांनी दिली होती.

त्यानुसार बैठक बोलाविण्यात आली आहे. बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल महिवाल, प्रकल्पाचे काम करणारी टाटा कंपनी यांसह संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Leave a Comment