






मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा; नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – महापौर मंजुषाताई नागपुरे
पुणे, दि. ७ जुलै : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागांत झाडे कोसळणे, रस्त्यांवर पाणी साचणे, घरांमध्ये व कॉलनींमध्ये पाणी शिरणे, भिंती व रस्ते खचणे तसेच वाहतुकीवर परिणाम होण्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात आज आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीत शहरातील सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विविध विभागांकडून सुरू असलेल्या उपाययोजना, आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी करण्यात आलेली तयारी तसेच विभागांमधील समन्वय यावर सखोल चर्चा करण्यात आली. कोणतीही आपत्ती उद्भवल्यास संबंधित विभागांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आवश्यक मदत व उपाययोजना कराव्यात, नागरिकांना त्वरित सहाय्य उपलब्ध करून द्यावे आणि सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करून परिस्थितीवर प्रभावी नियंत्रण ठेवावे, अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या.
यावेळी महापौर मा. मंजुषाताई नागपुरे यांनी सांगितले की, पुणे महानगरपालिका नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पूर्णपणे सज्ज असून सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग, क्षेत्रीय कार्यालये तसेच इतर संबंधित विभाग २४ तास कार्यरत असून नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण झाल्यास तातडीने मदत उपलब्ध करून देण्यात येईल. नागरिकांनीही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीस पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. नवल किशोर राम, सभागृह नेते श्री. गणेशजी बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्री. श्रीनाथ भिमाले, उपमहापौर श्री. पुरुषोत्तम वाडेकर, विरोधी पक्षनेते श्री. निलेश निकम, पक्षनेते श्री. नितीन गावडे, श्री. रामचंद्र कदम तसेच सहकारी नगरसेवक, संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.