Following the water discharge from Khadakwasla Dam, Mayor Manjusha-tai Nagpure visited the Ekta Nagar, Vitthal Nagar, and Shivaji Nagar areas at dawn and urged residents to remain alert.

Photo of author

By Sandhya

खडकवासला धरणाच्या पाण्याच्या विसर्गानंतर महापौर मंजुषा ताई नागपुरे यांची एकता नगर व विठ्ठल नगर तसेच शिवाजी नगर परिसराला पहाटे भेट; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या माननीय महापौर मंजुषा ताई नागपुरे यांनी आज पहाटे सिंहगड रस्त्यावरील एकता नगर व विठ्ठल नगर या संभाव्य बाधित परिसरांची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी महापौरांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.

या प्रसंगी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनामार्फत आवश्यक सूचना देण्यात आल्या. नदीपात्रालगत तसेच सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि आवश्यकता भासल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर मंजुषा ताई नागपुरे यांनी केले.

महापौर म्हणाल्या, “पुणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी महानगरपालिका पूर्णपणे सज्ज असून आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करून दिली जाईल.”

पाहणीदरम्यान स्थानिक नागरिक उपस्थित होते. त्यांच्या सूचनांची दखल घेत संबंधित यंत्रणांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

Leave a Comment

You cannot copy content of this page