

सासवड-वीर रस्त्यावर मद्यधुंद कारचालकाचा थरार; पांगारे येथील दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर
सासवड-वीर रस्त्यावरील काळुबाई मंदिराजवळ शनिवारी सकाळी एका मद्यधुंद कार चालकाने मृत्यूचे तांडव घडवले. दारूच्या नशेत भरधाव कार चालवत आरोपीने दोन दुचाकींना भीषण धडक दिली. या अपघातात पांगारे येथील दोन जणांचा जागीच अंत झाला, तर पिंपळे येथील पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय सुहास परब (वय ३०, रा. अमनोरा हडपसर, पुणे) हा शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास आपली कार ( एम एच ४७ सी डी ७७०८ ) घेऊन वीर बाजूकडून सासवडकडे निघाला होता. काळुबाई मंदिराजवळील धोकादायक वळणावर, आरोपीने मद्यप्राशन केलेले असतानाही रस्त्याच्या स्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून गाडी सुसाट चालवली. यावेळी त्याने समोरून येणाऱ्या दोन वेगवेगळ्या मोटारसायकलींना जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत एका दुचाकीवरील (एम एच १२ सी एफ २७८८) रवींद्र गोपाळ काकडे (वय ६५ वर्षे ) आणि महेंद्र संपत काकडे (वय ५३ वर्षे ) या दोन्ही शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. गावच्या दोन प्रतिष्ठित व्यक्तींचा अशा अपघाती मृत्यूमुळे पांगारे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दुसऱ्या दुचाकीवरील ( एम एच १२ एच क्यू १८०९ ) तुकाराम जयवंत पोमण (वय ६० वर्षे ) आणि सुरेखा तुकाराम पोमण (वय ५० वर्षे ) (रा. पिंपळे) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची भीषणता पाहून परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच सासवड पोलिसांनी तातडीने धाव घेत आरोपी अक्षय परब याला ताब्यात घेतले. प्रकाश राजाराम काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०५ (सदोष मनुष्यवध), २८१, १२५(ए), १२५(बी), ३२४(४) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सासवड पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून निष्पापांचा बळी घेणाऱ्या चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.