



मातीच्या फलकांपासून पुण्याच्या मंगळवार पेठेपर्यंत : जनगणनेचा इतिहास
आज आपण जनगणनेचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर घराघरांत जाऊन माहिती गोळा करणारे कर्मचारी, संगणक, टॅबलेट आणि लोकसंख्येचे प्रचंड आकडे उभे राहतात. परंतु जनगणनेचा इतिहास हा केवळ लोक मोजण्याचा इतिहास नाही; तो मानवी संस्कृती, राज्यकारभार, करव्यवस्था, युद्ध, व्यापार आणि नागरी विकासाचा इतिहास आहे. एखाद्या राजव्यवस्थेला आपल्या राज्यात किती लोक आहेत, किती जमीन लागवडीखाली आहे, किती कर मिळू शकतो आणि युद्धकाळात किती सैनिक उभे राहू शकतात हे जाणून घेण्याची गरज होती. या गरजेतूनच जनगणनेचा जन्म झाला.
इतिहासकारांच्या मते जगातील सर्वात जुन्या जनगणनांचे पुरावे सुमारे सहा हजार वर्षांपूर्वीच्या बाबिलोनिया आणि इजिप्तमध्ये आढळतात. त्या काळात लोकसंख्या, जनावरे, शेती उत्पादन आणि मालमत्तेच्या नोंदी मातीच्या फलकांवर कोरल्या जात होत्या. प्राचीन इजिप्तमध्ये नाईल नदीच्या पुरानंतर जमिनीचे पुनर्वाटप आणि कर आकारणीसाठी या नोंदी वापरल्या जात असत. चीनमध्ये इ.स. २ मध्ये झालेल्या जनगणनेत तब्बल ५ कोटी ७६ लाख लोकांची नोंद झाली होती, जी त्या काळातील जगातील सर्वात मोठी लोकसंख्या नोंद मानली जाते. रोमन साम्राज्यात तर जनगणना ही शासनव्यवस्थेचा अविभाज्य भाग होती. दर पाच वर्षांनी नागरिक, त्यांची मालमत्ता आणि सैनिकी क्षमता यांची नोंद घेतली जात असे. आज वापरला जाणारा “सेन्सस” हा शब्दही रोमन भाषेतील “सेन्सेरे” या शब्दापासूनच आला आहे.
भारतामध्येही जनगणनेची परंपरा फार जुनी आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात नागरिकांची, त्यांच्या व्यवसायांची आणि मालमत्तेची नोंद ठेवण्याचे निर्देश आढळतात. मौर्यकालात प्रशासनाकडे अशा प्रकारच्या नोंदी उपलब्ध असत. मोगल काळात अबुल फजलने लिहिलेल्या आइन-ए-अकबरीमध्ये राज्याची लोकसंख्या, शेती, महसूल, उद्योग आणि सामाजिक जीवनाची विस्तृत माहिती दिली आहे. जरी ती आधुनिक अर्थाने जनगणना नसली तरी लोकसंख्याविषयक माहितीचा तो एक महत्त्वाचा स्रोत मानला जातो.
महाराष्ट्रात जनगणनेसाठी “खानेसुमारी” हा शब्द प्रचलित होता. पेशवाईच्या काळात महसूल, कर आकारणी आणि प्रशासनासाठी शहरातील घरे, वाडे, दुकाने, देवळे, मठ आणि रहिवाशांची नोंद ठेवली जात असे. या नोंदी आज इतिहास संशोधकांसाठी अमूल्य ठेवा ठरल्या आहेत. पुण्यातील विविध पेठांची खानेसुमारी त्यापैकीच एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे.
याचे सर्वात रोचक उदाहरण म्हणजे मंगळवार पेठेची इ.स. १८१८ नंतरची खानेसुमारी. पेशवाईचा अस्त झाल्यानंतर आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने पुण्याचा ताबा घेतल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत ही नोंद तयार करण्यात आली. आज ही कागदपत्रे आपल्याला दोनशे वर्षांपूर्वीच्या पुण्यात प्रत्यक्ष फिरून आल्याचा अनुभव देतात.
या खानेसुमारीनुसार मंगळवार पेठेत एकूण २६१ घरे आणि ७०५ खण होते. आज एखाद्या मध्यम आकाराच्या गृहनिर्माण सोसायटीत जितकी घरे असतात, तितकी संपूर्ण पेठेत नव्हती. त्या घरांपैकी ७४ माडीची, ८३ एकमजली आणि ८५ छपरी घरे होती. म्हणजेच त्या काळातही घरांच्या प्रकारांवरून आर्थिक स्थितीचा अंदाज घेतला जात होता. विशेष म्हणजे १७ खुल्या जागांची आणि दोन देवळांची स्वतंत्र नोंद करण्यात आली होती. यावरून प्रशासनाची माहिती संकलित करण्याची पद्धत किती तपशीलवार होती याची कल्पना येते.
या पेठेतील सामाजिक रचनाही तितकीच मनोरंजक होती. ४२ ब्राह्मण, ४६ कुणबी-मराठे, २७ वाणी, १२ तेली, ६ मुसलमान, ४ जैन, ३ कुंभार, ३ गोसावी आणि १ सोनार यांची घरे येथे होती. आज ज्या विविधतेचा अभिमान पुणे बाळगते, तिची मुळे दोनशे वर्षांपूर्वीच्या या नोंदीत स्पष्ट दिसतात.
मंगळवार पेठेतील जीवन केवळ निवासी नव्हते; ते आर्थिक आणि प्रशासकीय दृष्ट्याही महत्त्वाचे होते. येथे चार सरकारी चौक्या कार्यरत होत्या. म्हणजेच त्या काळातही कायदा आणि सुव्यवस्थेसाठी संघटित यंत्रणा अस्तित्वात होती. दोन प्रमुख देवळे होती आणि त्यांना करमाफी देण्यात आली होती. गोसाव्यांचे मठ आणि काही इतर संस्थांनाही करसवलती मिळत होत्या. आजच्या करसवलतींच्या संकल्पनेची ही ऐतिहासिक झलक म्हणता येईल.
या नोंदीत त्या काळातील प्रतिष्ठित व्यक्तींचाही उल्लेख आहे. महादेव मायेनकर, सिताराम नाईक चिकटे, बालाजीपंत दामले, भिकाजीपंत सुभेदार, हाणवतराव सितोले यांसारखे सावकार, सरदार आणि मुत्सद्दी या पेठेत राहत होते. त्यामुळे ही खानेसुमारी केवळ लोकसंख्येची नोंद नसून त्या काळच्या पुण्याच्या सामाजिक आणि आर्थिक अभिजनांचा आराखडाच ठरते.
ब्रिटिशांनी १८७२ मध्ये भारतात पहिली व्यापक जनगणना करण्याचा प्रयत्न केला आणि १८८१ मध्ये पहिली अधिकृत, देशव्यापी आणि एकाच वेळी होणारी जनगणना पार पडली. तेव्हा भारताची लोकसंख्या सुमारे २५ कोटी होती. आज भारताची लोकसंख्या १४० कोटींहून अधिक आहे. परंतु जनगणनेचे महत्त्व मात्र बदललेले नाही. पूर्वी ती कर आणि सैन्यासाठी वापरली जात होती; आज ती विकास, नियोजन, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक न्यायासाठी वापरली जाते.
म्हणूनच जनगणना ही केवळ आकडेवारी नसते. ती इतिहासाची टाइम मशीन असते. जशी मंगळवार पेठेची १८१८ मधील खानेसुमारी आपल्याला पेशवाईनंतरच्या पुण्याचे जिवंत चित्र दाखवते, तशीच आजची जनगणना भविष्यातील इतिहासकारांना आपल्या काळातील भारताचे दर्शन घडविणार आहे. दोनशे वर्षांनंतर कदाचित एखादा संशोधक आजच्या नोंदी वाचत असेल आणि आपल्या समाजाची कथा उलगडत असेल. म्हणूनच जनगणना म्हणजे केवळ लोकांची मोजणी नव्हे, तर काळाची नोंद होय. त्यामुळे सर्व जनतेनी यात सहभाग नोंदवावा. आलेल्या प्रगणकाला आपल्या देशाच्या विकासाच्या पायाभरणीचा दूत समजून त्याला सौजन्यपूर्ण वागणूक द्यावी. याबाबतीत प्रशासनानेही वेळोवेळी सहकार्याचे आवाहन केले आहे. चला आपण या शतकातल्या सर्वात मोठ्या जनगणनेत सहभाग नोंदवून साक्षीदार होऊ या…!!