
नृत्य आणि दिलखेच अदांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना कोल्हापूर जिल्ह्यात परवानगी नाकारण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर आणि राधानगरी तालुक्यातील काही मंडळांकडून गौतमीच्या नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, मात्र बंदोबस्ताचे कारण देत पोलिसांकडून परवानगी नाकारली आहे.
दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात असे कार्यक्रम आयोजित करु नये, असे आवाहन जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडीत यांनी केले आहे.
ढोल-ताशांचा गजर आणि बेंजो पथकांच्या दणदणाटात घरोघरी बाप्पांचे मंगळवारी जल्लोषी आगमन झाले. चैतन्यदायी वातावरणात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला.
डीजेच्या दणदणटावर थिरकत उत्साही व जल्लोषी वातावरणात मंगळवारी जिल्ह्यात तरुण मंडळांनी गणरायाचे स्वागत केले. साऊंड सिस्टीम, लाईट इफेक्टस्च्या झगमगाटात सार्वजनिक मंडळांच्या गणेश आगमनाच्या मिरवणुका निघाल्या.
बाप्पा विराजमान झाल्यानंतर आता तरूण मंडळांकडून समाजप्रबोधनपर देखावे, विविध सामाजिक उपक्रमांसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
यातच कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील नंदगाव आणि राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथे प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे तरुण मंडळांकडून आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी मंडळांनी पोलिसांकडून परवानगी मागितली होती. पोलिसांनी मात्र कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत गौतमीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे.