गिरीश महाजन : शिंदेंचे आमदार अपात्र झाले तरी सरकारला धोका नाही…

Photo of author

By Sandhya

गिरीश महाजन

आमच्याकडे दोनशेच्यावर आमदार आहेत. त्यामुळे आमदार अपात्र प्रकरणाचा निर्णय काहीही आला तरी राज्यातील सरकारला कोणताही धोका निर्माण होणार नाही.

शिवसेना आमदार अपात्र ठरले तरी, आमच्याकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे सरकार स्थिर राहणार आहे, असा दावा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.

शिंदे यांची बाजू भक्कम आहे. पक्षाचे सर्वाधिक आमदार, खासदार, पदाधिकारी त्यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे निर्णय सकारात्मकच लागेल, असा आशावादही महाजन यांनी व्यक्त केला.

तहसीलदारपदाचा राजीनामा देऊन राजकारणात उतरलेल्या राजश्री अहिरराव तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाशी संबंधित सोनालीराजे पवार व काँग्रेसच्या माजी नगरसेविका अश्विनी बोरस्ते आदींसह विविध पक्षांतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी भाजपच्या ‘वसंतस्मृती’ कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आमदार अपात्रता प्रकरणाच्या बुधवारच्या संभाव्य निकालाविषयी महाजन यांनी भाष्य केले. महाजन म्हणाले की, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण ही न्यायालयीन बाब आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणीसाठी आले आहे. या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष निकाल देणार आहेत. आता ते जो निर्णय देणार असतील तो सगळ्यांना मान्य करावा लागणार आहे.

परंतु विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला हा निर्णय संपूर्ण देशासाठी दिशादर्शक असेल आणि महत्त्वाचा असणार आहे, असे नमूद करत उद्धव ठाकरे व शरद पवार हे न्यायव्यवस्थेवर टोकाला जाऊन टीका करत आहेत. त्यांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही, असा आरोपही महाजन यांनी केला.

Leave a Comment