खा. उदयनराजे भोसले : माझ्या लोकसभा उमेदवारीची इतरांकडूनच मागणी

Photo of author

By Sandhya

उदयनराजे भोसले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला चांगले नेतृत्व मिळाले आहे. छत्रपती शिवरायांच्या विचारांचे आचरण नरेंद्र मोदी यांनीच केले. मी इश्यूबेस्ड पॉलिटिक्सचा विचार करत असल्याने सातारा लोकसभा निवडणुकीत विजयी होऊनही तीन महिन्यांत राजीनामा दिला.

लोकसभा निवडणुकीत उमेदवारीची मागणी करणारे माझ्यासाठीच आग्रह करत आहेत, अशी गुगली खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत टाकली. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस येथे केंद्र शासनाच्या विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले म्हणाले, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभर राबवण्यात येत आहे. संघटन कौशल्यामुळे सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपची ओळख झाली आहे. मोती वेचावेत अशी भाजपची टीम नरेंद्र मोदी यांनी तयार केली आहे. विविध संघटनात्मक कार्यातून जाळे निर्माण केले आहे.

मराठा आरक्षणावर उदयनराजे म्हणाले, आपण सर्वांना आरक्षण कसे काय देऊ शकतो? यासाठी नरेंद्र मोदी यांना विनंती केली की सारथी संस्थेला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन द्यावा. रोजगार मिळवण्यापेक्षा उद्योगधंद्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन द्यावा.

केंद्रीय मंत्री मिश्रा तुमच्यासाठी लोकसभेचे तिकीटच घेऊन आले आहेत का? असे विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, मी आजवर लोकसभा निवडणूक लढवली. 2019 साली लोकसभा निवडणुकीत विजयी झालो.

सरपंचपदाचाही कुणी राजीनामा देत नाही पण निवडून आल्यावर पहिल्या तीन महिन्यात मी राजीनामा दिला. मूळ कारण समजून घ्या, माझी राजघराण्याच्या विचारांशी बांधिलकी आहे. त्यांचे विचार आचरणात आणतो.

मी इश्यू बेस्ड पॉलिटीक्सचा विचार करतो. राजकारण कधीही केले नाही. समाजकारणातून लोकांचे हित जपण्याचा प्रयत्न करतो. लोकसभा निवडणुकीसाठी इतरांनी इच्छा व्यक्त केली असताना तुमची भूमिका अजून मांडलेली नाही, असे विचारले असता खा. उदयनराजे यांनी ज्या-ज्या लोकांनी इच्छा व्यक्त केली ती माझ्यासाठीच आहे, अशी गुगली टाकली.

खा. उदयनराजे यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याची घडामोड सांगताना म्हटले की, त्यावेळी मी राजकीय आत्महत्या केली असे म्हटले गेले. जे विचार पटत नाहीत तिथे मी थांबत नाही. मनाला न पटणार्‍या बाबी उघडपणे सांगितल्या.

कुणालाही कमी लेखत नाही. मी चुकीचे वागलो असेल तर शासन झाले पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून काही कर्तव्ये असतात. लोकांच्या नजरेत पडलो तर तोंड दाखवायच्या लायकीचा राहत नाही. यावेळी माजी आमदार मदनदादा भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, डॉ. अतुल भोसले, सुनील काटकर, प्रितम कळसकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment