अवैध धंदेवाल्यांशी कथित लागेबांधे असल्याची नागरिकांमध्ये चर्चा; पाटस यात्रेच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी
दौंड तालुक्यातील पाटस पोलीस चौकीच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांनी पुन्हा डोके वर काढल्याची चर्चा परिसरात जोरदार सुरू आहे. अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात असून, या प्रकारांना नेमका कोणाचा आशीर्वाद आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, पाटस परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कथित आर्थिक व्यवहारांबाबत आणि अवैध धंदेवाल्यांशी असलेल्या संबंधांबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे ‘कर्मचारी तुपाशी, अधिकारी उपाशी?’ अशी उपरोधिक चर्चा नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहे. मात्र, या चर्चेची अधिकृत पडताळणी होणे आवश्यक आहे.
दरम्यान, पाटस गावची यात्रा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे. मात्र, एकीकडे यात्रेच्या बंदोबस्ताची तयारी सुरू असताना दुसरीकडे अवैध धंदेवाल्यांच्या हालचाली आणि कथित बैठकींबाबत चर्चा सुरू असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यात्रा शांततेत पार पडावी, नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे आणि अवैध धंद्यांना आळा बसावा, यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. पाटस परिसरातील अवैध धंद्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गोपनीय चौकशी करावी. तसेच संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची निष्पक्ष तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पाटस परिसरातील अवैध धंद्यांना आळा घालणार का? कथित आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार का? की यात्रेच्या गर्दीत पुन्हा अवैध धंदेवाल्यांचेच फावणार? असे प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.
