इनोव्हा – ‘पिकअप’ची भीषण धडक –  तीन ठार

Photo of author

By Sandhya

जुन्नर  : नगर-कल्याण महामार्गावर इनोव्हा आणि ‘पिकअप’ यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत तीन जण ठार झाले, तर तिघे जखमी आहेत. हा अपघात सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान वाटखळे गावाजवळ घडला.

       राहुल प्रभाकर मुळे (वय ३०, मांजरवाडी, ता. जुन्नर), विकी त्रिपाठी आणि निखिल राऊत (पूर्ण पत्ता उपलब्ध नाही) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. योगेश हाडवळे, शैलेशसिंह आणि प्रिन्स तिवारी अशी जखमींची नावे आहेत. 

      मृत आणि जखमी सर्व जण ‘इनोव्हा कारमधील आहेत. हाडवळे आणि शैलेशसिंह गंभीर जखमी असून, तिवारी किरकोळ जखमी आहेत. अपघातात ‘पिकअप’ चालकही जखमी झाला आहे.

       अपघाताची माहिती मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख माउली खंडागळे यांनी जखमींना मदत केली.

      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपर येथील तरुण एका समारंभानिमित्त ‘इनोव्हा ‘ मधून जुन्नरकडे येत होते, तर शेतमाल घेऊन ‘पिकअप’ मुंबईकडे जात होती. या वेळी माळशेज घाटाजवळील वाटखळे गावाजवळ दोन्ही वाहनांची धडक झाली.

अपघातामध्ये ‘इनोव्हा’चा चक्काचूर झाला. गाडीतील ‘एअरबॅग’ फुटून अस्ताव्यस्त पडल्या होत्या. मृतांची ओळख पटवणेदेखील अवघड झाले होते. अपघात झाल्यानंतर वाटखळे ग्रामस्थ मदतीसाठी धावले.

Leave a Comment