जरांगे पाटील : ओबीसी बांधवांनो, मराठ्यांना तुमच्या पाठबळाची गरज

Photo of author

By Sandhya

जरांगे पाटील

आरक्षण असलेल्या विदर्भ आणि खान्देशातील कुणबी ओबीसी बांधवांना विनंती आहे, मराठ्यांना तुमच्या पाठबळाची गरज आहे. तुम्हाला आरक्षण आहे म्हणून थंड बसू नका, मराठ्यांचे लेकरू वेदनेने त्रासतेय. आपले रक्त एक आहे, आपली पोरे आणि आपली जात जगली पाहिजे यासाठी एकजूट ठेवा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी अमळनेर येथील सानेगुरुजी विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सभेत केले.

सकल मराठा समाजातर्फे सभेचे आयोजन करण्यात आले होते. जरांगे पाटील पुढे म्हणाले की, राजकीय स्वार्थापोटी एक नेता जातीय भांडणे लावण्याचे काम करत आहे. आमच्या मनात पाप राहिले असते तर काहीच्या काही झाले असते. येवल्याचा हा पहिला मंत्री आहे जो महापुरुषाची जात काढतो.

मी तुमच्या बळावर लढतो, त्याला पाहण्यासाठी मी खंबीर आहे. महाराष्ट्रातील मराठा ही एकमेव जात आहे की जी आरक्षणाची अट पूर्ण करते. बाकी कोणतीही ओबीसी असलेल्या जातीकडे त्या अटींची पूर्तता होत नाही.

मराठ्यांना ७० वर्षांपासून आरक्षण का दिले नाही याचे उत्तर शासनाकडे नाही. सरकारला माझी भाषा कळत नाही. मला गोर गरिबांच्या वेदना कळतात, मी त्याच मांडतो.

माझे पद, पैसे, इंग्रजीचे जमत नाही, आपल्या वाटेला आलेलं कष्ट आपल्या मुलांना यायला नको म्हणून आरक्षण पाहिजे. माझ्या मराठ्यांच्या लेकरांच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद पाहिजे.

मला समाजाशी गद्दारी करायची नाही. माझ्या समाजाला संपवण्यासाठी षडयंत्र रचले आहे. मात्र, मराठ्यांचे स्वप्न आहे, काहीही झाले तरी आरक्षण मिळवायचे आहे.

जळगाव जिल्ह्यात साडेतीन लाख नोंदी मिळाल्या. महाराष्ट्रात ३२ लाख नोंदी सापडल्या. एका नोंदीवर २०० प्रमाणे २ कोटी मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे.

२४ डिसेंबरपर्यंत सरकारने वेळ दिलाय. मला डॉक्टरांनी दोन महिने आराम करायला सांगितला आहे. पण मेलो तरी चालेल, मराठ्यांना ओबीसी आरक्षण घेणारच, फक्त शांततेने आंदोलन करा, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.

Leave a Comment