जयंत पाटील : लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी आग्रही

Photo of author

By Sandhya

जयंत पाटील

कोल्हापूर जिल्हा पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा गड आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दोन्ही जागांसाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. परंतु, यासंदर्भातील निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दि. 25 ऑगस्ट रोजी दसरा चौकामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेसाठी सुरू असलेल्या तयारीच्या पाहणीकरिता पाटील सोमवारी रात्री कोल्हापुरात आले होते.

सभेच्या ठिकाणाची पाहणी करून त्यांनी माहिती घेतली. यावेळी त्यांनी काही बदल करण्याबाबत सूचना दिल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, शरद पवार यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

कोल्हापूरच्या सभेसही चांगला प्रतिसाद मिळणार आहे. पक्षाचे काही कार्यकर्ते सोडून गेले आहेत. सामान्य जनता मात्र शरद पवार यांच्यासोबतच आहे. बरीच वर्षे एकत्र काम केल्यामुळे गाठीभेटी होत असतात. त्यातून अर्थ काढण्यात काय अर्थ आहे.

शरद पवार यांनी आतापर्यंतच्या सभांमधून आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. पक्षातून निघून गेलेल्यांपैकी सर्वच शरद पवार यांचा फोटो लावतात. काही त्यांना आपले दैवत मानतात, काही विठ्ठल मानतात. परंतु, यावर पवार कोल्हापुरातही आपली भूमिका स्पष्ट करतील, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारी असल्याने समतेचा संदेश देणार्‍या कोल्हापुरात होणार्‍या या सभेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक चांगला संदेश जाईल. नवाब मलिक यांना आरोग्याच्या द़ृष्टीने दोन महिन्यांची रजा मिळाली आहे.

मी त्यांना वैयक्तिक भेटलो आहे; पण त्यांच्या अडचणीत वाढ होऊ नये, अशी आमची भूमिका आहे, असेही पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

यावेळी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, राजीव आवळे, मदन कारंडे, नितीन जांभळे, रोहित पाटील, नितीन पाटील, जयकुमार शिंदे आदी उपस्थित होते.

Leave a Comment