
कल्याण पूर्व भागात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या केल्याच्या प्रकरणात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज शिवसेना पूर्व मध्यवर्ती शाखेपासून पोलीस ठाण्यापर्यंत निषेध मोर्चा काढला. यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसरातील दारुचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची मागणी केली.
कल्याण शहरात फिरणाऱ्या नशेखोरांवरती कारवाई करण्यासोबतच परिसरातही मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही लावावे, अशीही मागणी ठाकरे गटाने केली. नेहमी मुलींवरती अत्याचार करून मनोरुग्णाचे सर्टिफिकेट दाखवत न्यायालयातून सुटणाऱ्या आरोपींच्या सर्टिफिकेटची चौकशी करावी, त्याचप्रमाणे त्यांना सर्टिफिकेट दिलेल्या डॉक्टरांची देखील चौकशी करावी अशा प्रकारचे निवेदन पोलिसांना दिले आहे.
शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
कल्याण पूर्वेतील पीडितेवर शेकडो नागरिकांच्या आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत कल्याण पश्चिमेकडील बैलबाजार परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नागरिकांनी रस्ता रोको करत स्मशानात अंतिम संस्कार तब्बल चार तास रोखून धरले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून कारवाईचे आश्वासन द्यावे, त्यानंतरच अंत्यसंस्कार केले जातील, अशी भूमिका संतापलेल्या नागरिकांनी घेतली होती. अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी, ‘हा खटला चालवण्यासाठी सरकारी वकील अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, आरोपीला फाशी देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. हा गुन्हा फास्ट ट्रक कोर्टात चालविला जाणार आहे’, असे आश्वासन दिल्याचे पोलिस उपायुक्तांनी उपस्थित जनसमुदायाला सांगितले. यानंतर नागरिकांनी माघार घेत अंत्यसंस्कार पूर्ण करण्यात आले.