केंद्रीय मंत्री राणेंविरोधात कॉंग्रेसचे राज्यात आंदोलन; मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी

Photo of author

By Sandhya


केंद्रीय मंत्री राणेंविरोधात कॉंग्रेसचे राज्यात आंदोलन

भारतीय जनता पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हिंदू धर्मासाठी शंकराचार्यांचे योगदान काय ? असा प्रश्न विचारून शंकराचार्य आणि हिंदू धर्माचा अपमान केला आहे.

शंकराचार्यांना प्रश्न विचारून हिंदूंचा अपमान करणा-या नारायण राणेंविरोधात काँग्रेसने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. राज्यभर हे आंदोलन करण्यात आले, यावेळी नारायण राणेंविरोधात घोषणा देत त्यांचा तीव्र निषेध करण्यात आला.

हिंदू धर्माचा व शंकाराचार्यांचा अपमान करणाऱ्या नारायण राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, मुनाफ हकीम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नारायण राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

पुण्यातील बालगंधर्व चौकात आमदार रविंद्र धंगेरकर, शहराध्यक्ष अरविंद शिंदे व पदाधिकारी यांनी आंदोलन केले. छत्रपती संभाजीनगर येथे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष कल्याण काळे, शेख युनुस व पदाधिकारी यांनी क्रांती चौक येथे आंदोलन केले.

लोणावळा शहर महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. नारायण राणे मुर्दाबाद, नारायण राणे माफी मांगो, अशी घोषणाबाजी करण्यात आली. भारतीय जनता पक्षाने राम मंदिराचा इव्हेंट करुन राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

राम मंदिर हा आस्थेचा प्रश्न आहे, अयोध्येत राम मंदिर व्हावे ही सर्वांचीच इच्छा आहे परंतु भारतीय जनता पक्ष मंदिराच्या नावाखाली स्वतःचा स्वार्थ पहात आहे. अर्धवट मंदिरात प्राण प्रतिष्ठा करणे चुकीचे आहे असे चारही शंकराचार्यांनी म्हटले आहे.

भाजपा व त्यांचे नेते आता शंकराचार्यांना उलट प्रश्न विचारून त्यांचे योगदान विचारत आहे. नारायण राणे यांनी केलेल्या या मुजोरीविरोधात काँग्रेसने राज्यभर आंदोलन करून संताप व्यक्त केला.

Leave a Comment