खासदार संजय राऊत : शिवसेनेचे वाघ नसते, तर हिंदुत्वावरील कलंक दूर झाला नसता

Photo of author

By Sandhya

खासदार संजय राऊत

काही लोक म्हणतात की, राममंदिर लढ्यात शिवसेनेचे योगदान काय, त्यांच्यासाठी अयोध्येतील कारसेवेवरील ‘रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ’ हे दालन खुले करण्यात आले आहे.

डोळे उघडे ठेवा आणि हे पाहा, अशा शब्दांत भाजपवर टीका करत, शिवसेनेचे वाघ नसते, तर या हिंदुत्वाला जो अनेक वर्षांपासून कलंक होता तो दूर झाला नसता, असा दावा शिवसेने(उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे खासदार संजय राऊत यांनी केला. शिवसेने(उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे राज्यस्तरीय महाअधिवेशन मंगळवारी (दि. २3) त्र्यंबकरोडवरील हॉटेल डेमोक्रसी येथे होत आहे.

तत्पूर्वी अयोध्येतील श्रीरामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शिवसैनिकांनी कारसेवेत निभावलेल्या भूमिकेविषयी ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून अधिवेशनस्थळी आयोजित ‘रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ’ या प्रदर्शनाचे उद्घाटन खा. राऊत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले की, या प्रदर्शनाची संकल्पना सुभाष देसाई यांची आहे. त्यांनी या प्रदर्शनासाठी अत्यंत मेहनत घेतली. अधिवेशन करायचे ठरले, तेव्हा त्यांच्या डोक्यात असे आले की, अयोध्येला आपण जात नाहीये.

अयोध्येच्या राम मंदिर संघर्षात शिवसेनेचे जे योगदान आहे, ते सगळ्यांना माहीत व्हावे. ते म्हणाले की, आपण पाहिले असेल की, तरुणपणीचे सुभाष देसाई आपल्याला दिसले होते. शाळेतला मुलगा दप्तर घेऊन जातो. तसे ते पाठीला हत्यार बांधून चाललेले होते.

त्यावेळी मनोहर जोशी, चंद्रकांत खैरे आदी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. हा आमचा ठेवा आहे. काही लोक म्हणतात की, शिवसेनेचे योगदान काय, त्यांच्यासाठी हे दालन खुले, डोळे उघडे ठेवा आणि हे पाहा, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. शिवसेनेचे वाघ नसते, तर या हिंदुत्वाला जो अनेक वर्षांपासून कलंक होता, तो दूर झाला नसता.

आता कोणी कितीही श्रेय घेऊ द्या. हे फार घाईने झालेले प्रदर्शन आहे. यात अजून सुधारणा होतील. संपूर्ण महाराष्ट्र हे बघेल. सुरुवात आम्ही नागपूरपासून करणार कारण देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे की, त्यांच्या काही स्मृतींना उजाळा मिळावा.

Leave a Comment

You cannot copy content of this page