शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरणाचा प्रभावी उपयोग करावा. कर्ज, नापिकी आदी बाबींमुळे शेतकऱ्यांच्याआत्महत्या होणार नाही यासाठी शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी कृषी विभागाने अधिकाधिक प्रयत्न करावे, असे आदेश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
साखर संकुल येथे राज्यस्तरीय रब्बी हंगामपूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्यांवेळी मुंडे यांनी हे आदेश दिले.
यावेळी कृषी विभागाचे मुख्य सचिव अनूप कुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, सहकार आयुक्त अनिल कवडे, कृषी विभागाचे सहसचिव गणेश पाटील, स्मार्टचे प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांच्यासह सर्व कृषी संचालक आदी उपस्थित होते.
मंत्री मुंडे म्हणाले, महाराष्ट्र एकेकाळी सर्वाधिक तृणधान्य आणि कडधान्य पिकविणारे राज्य होते. आज आपण यात खूप मागे पडलो असून ज्वारी, बाजरीसारख्या तृणधान्य, डाळवर्गीय पिकांचे महत्त्व आज लक्षात येत आहे.
त्यामुळे या पिकांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे लागेल. रब्बी हंगामात उत्पादनात वाढ होईल याबाबत अधिकाऱ्यांनी आत्मविश्वासाने काम करावे. चारा पिकांच्या उत्पादनासाठी प्रयत्न करावा
यंदा काही विभागात धरणांतील पाणीसाठ्याची परिस्थिती गंभीर असल्याने उन्हाळी आवर्तने देणे कठीण आहे. त्यामुळे हे क्षेत्र चारा पिकांच्या उत्पादनाकडे वळविण्यासाठी प्रयत्न करावा.
करडई, जवस, तीळ, मोहरी, पिवळी ज्वारी आदी कमी लागवड असलेल्या तृणधान्य, गळीत धान्याच्या लागवडीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांना या उत्पादनांना चांगला भाव मिळेल, याची हमी दिली पाहिजे. त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करावा, असे आदेश कृषीमंत्री मुंडे यांनी दिले.