सर्वच पक्ष लोकसभेच्या तयारीला लागले असताना उद्धव ठाकरे हेही आता मैदानात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या सर्व तयारीसाठी दहा शिलेदारांच्या नावांची घोषणा सोमवारी केली. यामध्ये संजय राऊत, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, अनिल देसाई, भास्कर जाधव, विनायक राऊत, राजन विचारे, रवींद्र वायकर, सुनील प्रभू या नेत्यांचा समावेश आहे. ते राज्यभर दौरे करणार आहेत.
उद्धव ठाकरेंनी अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा आणि त्यापाठोपाठ होणार्या विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. राज्यातील सर्वच लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांत मोर्चेबांधणी करण्यासाठी ठाकरेंनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
10 नेत्यांवर मोठी जबाबदारी टाकली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या संघटनात्मक बांधणीसाठी आता नवी रचना करण्यात आली आहे. पक्षाला बळकट करण्यासाठी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभागीय नेते जाहीर केले आहेत.
या नेत्यांच्या माध्यमातून ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्त्यांना राजकीय कार्यक्रम दिले जात आहेत.
आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 10 नेत्यांवर मोठी जबाबदारी टाकली आहे. याच स्ट्रॅटजीचा भाग म्हणून जानेवारीत शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यव्यापी शिबिर आयोजित केले जाणार आहे.