मध्यरात्रिच्या वेळी विजेच्या कडकड्यात बिबट्याने फोडली डरकाळी

Photo of author

By Sandhya

मध्यरात्रिच्या वेळी विजेच्या कडकड्यात बिबट्याने फोडली डरकाळी

शनिवारी मध्यान्ह रात्रीची बारा-साडेबाराची वेळ. जोरदार पावसाची चाहूल, विजेचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहत होते. अशातच घरातील वीजही गायब झालेली. मध्यान्ह रात्री भटक्या कुत्र्यांचा जोरदार भुंकण्याचा आवाज येत असतानाच ऐकू आली ती बिबट्याची डरकाळी. खिडकीतून पोर्चमध्ये नजर गेली तर दिसला दोन बछड्यासह बिबट्या. पाहता क्षणीच भीतीने गाळण उडाली.

एका भयपटातील दृष्याप्रमाणे अनुभूती आली ती वाळवा तालुक्यातील बहे गावलगत असलेल्या फार्णेवाडीतील हर्षल फार्णे यांना. गावातील चौकात दत्त मंदिराजवळ असलेल्या बंगल्यात फार्णे यांचे वास्तव्य.

नेहमीप्रमाणे झोपी गेल्यानंतर शनिवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास कुत्र्यांचा अचानक जोरजोराने भुंकण्याचा आवाज कानी आला. जोरदार वारे, आणि विजांचा कडकडाट सुरू असल्याने वीजही गायब झालेली. बाहेर कुत्र्यांचा ओरडा कशासाठी हे पाहावे म्हणून खिडकीतून पाहिले असता अंगावर शहारे आणणारे दृष्य बंगल्याच्या पोर्चमध्ये दिसले.

विजेच्या लखलखाटात दोन बछड्यासह बिबट्या पोर्चमध्ये उभा असल्याचे फार्णे यांना दिसले. गावातील कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज जसजसा वाढत चालला तसतसा बिबट्याने डरकाळी फोडून प्रतिसाद देताच भुंकणारी कुत्रीही गायब झाली.

बिबट्याची डरकाळी ऐकताच फार्णे यांची व घरातील अन्य कुटुंबाचीही पाचावर धारण बसली. मध्यान्ह रात्रीची वेळ असल्याने मदतीसाठी कोण येईल याची खात्री नव्हती. अशातच फार्णे यांनी जोराचा दंगा केल्याने बिबट्या आपल्या दोन बछड्यांसह बाहेरच्या दिशेने मार्गस्थ झाला. बंगल्याचे मुख्य प्रवेशद्बार बंदिस्त असल्याने सुदैवाने बिबट्याला आपल्या दोन बछड्यांसह बंगल्यात प्रवेश करता आला नाही.

Leave a Comment