
पुरंदर-हवेली विधानसभा निवडणुकीसाठी पुरंदर-हवेली मतदारसंघातून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार संजय चंदुकाका जगताप यांनी मंगळवारी (दि २९) उमेदवारी अर्ज दाखल केला.
याप्रसंगी पुरंदर-हवेलीतील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व आमदार संजय जगताप यांच्या चाहत्यांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येने गर्दी केली व यापूर्वीचे गर्दीचे सर्व विक्रम ओलांडले, असे प्रचारप्रमुख सुदाम इंगळे यांनी सांगितले. यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
सासवडच्या शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडर, महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नगर परिषद चौकातून अर्ज दाखल करण्यास भव्य मिरवणुकीने सुरुवात झाली. पारंपारिक वाद्यांच्या गजरात मुख्य रस्त्यावरून गांधी मैदान व तेथून नवीन प्रशासकीय इमारतीतपर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी प्रत्येक रस्ता गर्दीने काँग्रेसमय झाला होता. मिरवणूक मार्गावर आणि नवीन प्रशासकीय इमारतीच्या परीसरात गर्दीचा महापूर आल्याचा भास होत होता, असे सांगून पोमण म्हणाले, यापूर्वी पुरंदरमध्ये इतका लोकप्रतिसाद कोणालाही मिळाला नव्हता. यामध्ये युवक व महिलांची संख्या लक्षणीय होती. रॅलीदरम्यान अनेक ज्येष्ठ महिला व नागरिकांनी संजय जगताप यांना आशीर्वाद दिले.
आमदार संजय जगताप यांनी पहिल्या संधीत कोरोनाचे संकट आणि सत्ता विरोधी आमदार असतानाही पुरंदर-हवेलीच्या वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्न, समस्या सोडविल्या, शासनाच्या विविध विभागातून करोडो रूपयांचा विकास निधी आणून अनुशेष भरून काढण्याची कामे केली. यामुळे आमदार म्हणून पुन्हा संजय जगतापच पाहिजेत अशा चर्चा महिलावर्गात सुरू होत्या.
केवळ आमदार संजय जगताप यांच्यामुळेच पुरंदरचा पाण्याचा व बेरोजगारीचा प्रश्न कायमचा सुटेल, असा आशावाद महिला व्यक्त करीत होत्या. अनेकांनी आपण स्वयंप्रेरणेने आमदार जगताप यांचा प्रचार करीत असल्याचे आवर्जुन सांगितले. ‘अभूतपूर्व’ अशा एकाच शब्दांत या गर्दीचे वर्णन करावे लागेल, असेही इंगळे म्हणाले.