मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : भारताकडे वाकड्या नजरेने पाहायची हिंमत नाही…

Photo of author

By Sandhya

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारताने ‘चंद्रयान मोहीम व जी-२०’ चे यशस्वी आयोजन करत अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले. आजच्या घडीला भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कोणामध्ये नाही.

पंतप्रधान मोदी यांनी २०४७ पर्यंत सशक्त व सुदृढ भारत विकसित करायचा संकल्प हाती घेतला आहे. या संकल्पाच्या पूर्तीसाठी युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

तपोवन मैदान येथे आयोजित पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयाेजित २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. स्वामी विवेकानंद हे आपले प्रेरणास्रोत आहे. विवेकानंदांनी दिलेल्या मार्गावरून पुढे जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील नऊ वर्षांमध्ये देशाला भक्कम नेतृत्व दिले आहे.

मोदी लक्षद्वीपला काय गेले, तर मालदीवमध्ये भूकंप आला, अशी कोपरखळी मारत शिंदे यांनी जगभरातील भल्या भल्या नेत्यांना मोदींच्या एका भेटीची आतुरता लागून राहिलेली असते. भविष्यामधील समृद्ध भारताच्या दृष्टीने ही गौरवपूर्ण बाब असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

केंद्र सरकारने युवकांसाठी ‘स्टॉर्टअप इंडिया’सारख्या योजना यशस्वीपणे राबविल्या. या योजना डोळ्यासमोर ठेवत महाराष्ट्रातील युवकांसाठी शासनाने विविध योजना आणल्या आहेत. याद्वारे युवकांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासह रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

आगामी पाच वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था अधिक बळकट करताना ती जगात प्रथम तीनमध्ये येण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्नशील आहे. या कार्यासाठी युवकांची मदत अधिक गरजेची आहे. त्यामुळे स्वामी विवेकानंद यांच्या ‘उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्तीकडे मार्गक्रमण करा’ हा मंत्र युवकांनी आत्मसात करावा, असा सल्लाही शिंदे यांंनी उपस्थित युवकांना दिला.

कमजोर समजू नका देशातील १५ ते २९ वयोगटांतील २५ कोटी जनता ही उद्याच्या उज्ज्वल, सशक्त व सुदृढ भारताचे भविष्य आहे. स्वामी विवेकानंद यांच्या उपदेशानुसार जीवनात कधीही स्वत:ला कमजोर समजू नका, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्र उभारणीत योगदान द्यावे, असे आवाहन उपस्थित युवकांना केले.

मोदी हे तो मुमकिन है। अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र यांचे मंदिर पूर्णत्वास येत आहे. येत्या २२ जानेवारीला होणारा सोहळा हा शुभसंकेत असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

कोट्यवधी भक्तांचे तसेच हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्येमधील राम मंदिराचे स्वप्न नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. त्यामुळे मोदी यांचे आभार मानतो, असे सांगत ‘मोदी हे तो मुमकिन है।’ असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Leave a Comment