मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : महाराष्ट्र विदेशी थेट गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर

Photo of author

By Sandhya

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र आज विदेशी थेट गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर असून यामुळे रोजगारदेखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. राज्य कृषी, शिक्षण, ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि पर्यटन अशा सर्व क्षेत्रांत महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर राहील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे व्यक्त केला.

भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालय प्रांगणात ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.

तसेच त्यांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीर,शहीद यांना वंदन केले. राज्याचा प्रमुख म्हणून सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी काम करता आले याचे समाधानही आज माझ्या मनात आहे.

या स्वातंत्र्याला खरा अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल तर या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात आपल्याला आनंद निर्माण करता आला पाहिजे. समाजातील शेवटच्या घटकाला स्वातंत्र्य आणि विकास अनुभवता यावा यासाठी गरजूंच्या वेदनेवर फुंकर घालता आली पाहिजे.

तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय योजना पोहोचल्या पाहिजेत, असा शासनाचा मानस असून स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात झाले पाहिजे, असे शिंदे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेरी माटी, मेरा देश’ अशी घोषणा करून आपल्याला या जबाबदारीचे स्मरण करून दिले आहे.आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या आवाहनाचे जबाबदारीने पालन करून या अभियानात आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही शिंदे यांनी यावेळी केले.

Leave a Comment