मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : राजर्षी शाहू, बाबासाहेबांच्या स्मारकासाठी १९९ कोटी

Photo of author

By Sandhya

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक परिषद झालेल्या या माणगावात या दोघांचे संयुक्त स्मारक उभारण्यात येईल. त्याकरिता 199 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

लंडन हाऊस प्रतिकृतीच्या लोकार्पणाचे भाग्य मला लाभल्याची भावनाही शिंदे यांनी व्यक्त केली. माणगाव (ता. हातकणंगले) येथील माणगाव परिषदेच्या 15 ठरावांच्या शिलालेखाचे उद्घाटन, होलाग्राफिक शो व लंडन हाऊस प्रतिकृती इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले.

माणगावचे सुपुत्र आप्पासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने पहिली बहिष्कृत वर्गाची ऐतिहासिक माणगाव परिषद झाली. यामुळे ही पावन भूमी आहे. तिला मी वंदन करतो, असे सांगत शिंदे म्हणाले, होलोग्राफिक शो पाहताना राजर्षी शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्यक्ष आपल्याशी बोलता आहेत, असे दुर्मीळ क्षण अनुभवता आला.

डॉ. आंबेडकर वास्तव्य करीत असलेली लंडनमधील वास्तू शासनाने आपल्याकडे घेतल्याचा अभिमान आहे. त्याचीच प्रतिकृती माणगाव येथे साकारण्यात आली आहे. याकरिता जागा दिलेल्यांचे अभिनंदन करत शिंदे म्हणाले, अनेकजण श्रीमंत आहेत; पण देण्याची दानत येथील लोकांत आहे. जागा दिलेल्या या लोकांचा लवकरच मुंबईत गौरव केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला पालकमंत्री हसन मुश्रीफ, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार राजू आवळे, आमदार प्रकाश आवाडे,

राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्षी, आरपीआयचे राज्य सचिव मंगलराव माळगे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, उपसरपंच विद्या जोग, बौद्ध समाजाचे अध्यक्ष अमर कांबळे, पवन गवळी, शिरीष मधाळे, अनिल कांबळे, योगेश सनदी आदी उपस्थित होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page