महाविकास आघाडीबरोबर जाण्याची आपली इच्छा आहे. मात्र, महाविकास आघाडीचा समझोता न झाल्यास स्वतंत्र 48 जागा लढण्याची तयारी असून, 27 जागांवर तयारी पूर्ण झाली असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
महाविकास आघाडीमध्ये 15 जागांवर तीव्र मतभेद आहेत. यापैकी 10 जागांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)-काँग्रेस आणि 5 जागांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)-राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्यात समझोता झालेला नाही.
जागावाटपावरून महाविकास आघाडीचे घोंगडे भिजत पडले आहे. त्यामुळे यांची युती राहणार का, असा सवाल अॅड. आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित केला. अॅड. आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला आघाडीमध्ये घ्यायला तयार नव्हती. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने लोकसभेची तयारी सुरू केल्यानंतर तिन्ही पक्ष आघाडीच्या मागे लागले.
मात्र, महाविकास आघाडीत जागावाटपावरून अद्याप एकमत झालेले नाही. महाविकास आघाडीची जागावाटपासाठी पुन्हा बैठक आहे. यामध्ये त्यांचा निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.
मात्र, बैठकीत योग्य निर्णय न झाल्यास स्वतंत्र लढण्याची तयारीही केली आहे. गतवर्षी 9 मतदारसंघांत मुस्लिम मते काँग्रेसकडे वळली. त्याचा फटका वंचित आघाडीला बसला; अन्यथा भाजपच्या 9 जागा कमी झाल्या असत्या.
महाविकास आघाडीत जागावाटपावरून एकमत न झाल्यास आणि त्यांनी स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतल्यास भाजपविरुद्ध वंचित बहुजन आघाडी, असे निवडणुकीचे चित्र असेल, असेही त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणाबाबत भाजप आणि काँग्रेस यांनी योग्य भूमिका घेतलेली नाही.
त्याचा फटकाही या दोन पक्षांना बसेल, असेही त्यांनी सांगितले. यापुढे एमआयएमबरोबर कधीही युती करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर, प्रभारी डॉ. क्रांती सावंत, अफरोज मुल्ला यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.