‘आम्ही गद्दारी केली, आम्हाला धडा शिकवण्यासाठी मला मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचले’ असे भाजपवाले सांगत असले तरी या हुकूमशाही वृत्तीला अजून आम्ही धडा शिकवायचा बाकी ठेवले आहे. लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपला धडा शिकविल्याशिवाय शांत बसणार नाही.
ही लढाई पक्षाची नसून वाघ विरुद्ध लांडग्याची आहे, असा हल्ला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केला. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाकरे गटाच्या जनसंवाद यात्रेनिमित्त येथे शुक्रवारी झालेल्या सभेत ते बोलत होते. खासदार संजय राऊत, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘आमदार, खासदारांना खोक्यांचे आमिष दाखवून पळविले म्हणजे शिवसेना संपणार नाही. शिवसेना भाजपला मूठमाती देईल. लोकशाहीचा मुडदा पाडण्याचे काम भाजप करत आहे. सर्वांनी एकत्र येऊन भाजपच्या हुकूमशाहीला हद्दपार केले पाहिजे.
ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांचे कौतुक करतो. कारण त्यांनाही आमिष दाखविण्याचा प्रयत्न झाला होता. पण ते खरे शिवसैनिक आहेत. ते स्वाभिमानी असल्याने आमिषाला बळी पडले नाहीत,’’ असे ठाकरे म्हणाले.
उमेदवारीवर शिक्कामोर्तब – खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील हे खोक्याच्या बाजूने न जाता ‘ओके’च्या बाजूने उभे राहिले.
त्यांना येत्या निवडणुकीत परत संसदेत पाठविण्याची जबाबदारी निष्ठावंत शिवसैनिकांची आहे, असे ठाकरे यांनी सांगितल्याने त्यांनी लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकांत अनुक्रमे ओमराजे निंबाळकर, पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.
वाघाऐवजी खेकड्याला उमेदवारी – गत निवडणुकीत वाघाला उमेदवारी द्यायची सोडून खेकड्याला दिली, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्यावर टीका केली.
उमेदवारी देण्यात चूक झाल्याचे सांगत त्यांनी मतदारांची दिलगिरी व्यक्त केली. ‘खेकड्याने धरण फोडले असे म्हणणारा मंत्री होतो, हे दुर्दैव आहे.
खेकड्याच्या नांग्या कशा ठेचायच्या हे माहिती आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. घरगुती गॅस सिलिंडर दरात आज शंभर रुपये कपातीचा निर्णय झाला. त्यावर ठाकरे म्हणाले, की निवडणुकीच्या तोंडावर दर कमी करता, निवडणूक झाली की ५०० रुपयांनी भाव वाढविता, ही तुमची नाटक लोकांनी ओळखली आहेत.