
मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्दैवी घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल गुरुवारी (दि.२८) ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक झाली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला नव्याने भव्य स्वरुपात तयार करणे आणि उभारणे यासाठी जे. जे. स्कूल ऑफ आर्टस, आयआयटी, स्थापत्य अभियंते, महाराष्ट्रातील नामांकित शिल्पकार, तसेच नौदलाचे तांत्रिक अधिकारी यांची एक समिती नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले की, ही घटना दुर्दैवी असून शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. नौदलाने हा पुतळा राजकोट येथे नौदल दिन साजरा करण्याच्या निमित्ताने एका चांगल्या भावनेने उभारला होता.
पण भविष्यात अशा दुर्घटना परत कधीच घडू नये यासाठी अतिशय काळजी घेतली पाहिजे. उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा त्यांच्या लौकिकाला साजेसा हवा यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही.
राजकोट येथे शिवरायांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे आणि एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
ही समिती जबाबदारी निश्चित करणार आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनिषा म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव (नगर विकास) असीम कुमार गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, व्हाईस ऍडमिरल अजय कोचर, रियर ॲडमिरल मनीष चढ्ढा, शिल्पकार राम सुतार, विनय वाघ, शशिकांत वडके उपस्थित होते.
मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री… https://t.co/8NKTOUMtYi pic.twitter.com/Coyv2OHfZz
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 28, 2024