मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परदेश दौरा रद्द झाल्यानंतर आता राहुल नार्वेकर यांचा परदेश दौरा रद्द ; नेमकं कारण काय ?

Photo of author

By Sandhya

राहुल नार्वेकर यांचा परदेश दौरा रद्द ; नेमकं कारण काय ?

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परदेश दौरा रद्द झाल्यानंतर आता राज्यातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आमदार अपात्रतेच्या सुनावणीला होत असलेला उशीर आणि त्यात ठाकरे गटाने महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात घेतलेली धाव या पार्श्वभूमीवर नार्वेकरांचा  प्रस्तावित परदेश दौरा रद्द करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.

राहुल नार्वेकर हे दक्षिण आफ्रिकेतील घाना येथे होणाऱ्या ६६ व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेत सहभागी होणार होते. परंतु, आता अचानक त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.

हा दौरा रद्द करण्यामागचे कारण अजून तरी स्पष्ट झालेले नाही. परंतु, शिवसेनेच्या ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानंतर नार्वेकर यांचा हा दौरा रद्द करण्यात आला असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत आफ्रिकेतील घाना देशाचा दौरा करणार होते. एकीकडे गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील आमदार अपात्रतेची सुनावणी प्रलंबित आहे.

असे असताना नार्वेकर घानाला जाणार असल्याने विरोधकांनी टीका सुरू केली होती. दरम्यान, एका इंग्रजी वर्तमानपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या आठवड्याचा सुरुवातीला हा परदेश दौरा रद्द केला होता.

म्हणजेच ठाकरे गटाने टीका करण्याआधीच त्यांच्या नियोजित कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आले आहेत, असे म्हटले आहे.

राहुल नार्वेकर यांचा परदेश दौरा रद्द होण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लंडन-जर्मनी दौरा रद्द करण्यात आला आहे. ठाकरे गट सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक झाल्यामुळेच हे दौरे रद्द होत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या ट्वीटमुळे मुख्यमंत्र्यांचा लंडन-जर्मनी दौरा रद्द झाला तर ठाकरे गटाच्या प्रतिज्ञापत्रामुळे विधानसभा अध्यक्षांचा घाना दौरा रद्द झाल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे.

Leave a Comment