मुख्यमंत्री शिंदे : भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झालं

Photo of author

By Sandhya

मुख्यमंत्री शिंदे

‘चांद्रयान-3’नं चंद्रावर केलेल्या यशस्वी लॅन्डींगमुळे अमेरिका, रशिया, चीननंतर भारत जगातील चौथी अंतराळशक्ती ठरला आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा आजचा क्षण आहे.

बुद्धिवंतांचा देश अशी ओळख असलेल्या आपल्या भारताने आज हे देदिप्यमान, ऐतिहासिक यश मिळवलं आहे. ‘चंद्रयान ३’ मोहिमेमधील विक्रम लॅन्डर चंद्रावर उतरले आणि या मोहिमेतील सर्वांत महत्त्वाचा टप्पा आज पार पडला.

या यशाने सर्व भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. देशातील सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधकांचं हे यश आहे. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

त्यांनी पुढे म्हटलं आहे की, ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिशादर्शक नेतृत्वाचं आणि पाठिंब्याचं बळ शास्त्रज्ञांच्या पाठीशी आहे. श्रीहरीकोटा येथून १४ जुलैला ‘चंद्रयान ३’ हे चंद्राच्या दिशेने झेपावलं.

अनेक अवघड टप्पे त्याने यशस्वीपणे पार केले.‘चंद्रयान ३’ कडून वेळोवेळी पाठवण्यात आलेली छायाचित्रे आणि यानाची सकारात्मक प्रगती ही आजच्या या यशाची ग्वाही देत होते. भारतीयांना असलेली यशाची खात्री आणि शास्त्रज्ञांचे कर्तृत्व आणि त्यांच्या बुद्धिमत्तेवरील अढळ विश्वास आज सार्थ ठरला आहे.

असं देखील त्यांनी म्हटलं आहे. या मोहिमेत इस्त्रोसोबतच देशातील काही खासगी कंपन्यांचा देखील सहभाग होता, ज्यांचा आम्ही नुकताच ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने सन्मान् केला त्या रतन टाटाजी यांच्या टाटा स्टील कंपनीमध्ये बनविण्यात आलेल्या क्रेनचा वापर रॉकेट लॉन्चसाठी करण्यात आला, याचा मला अतिशय आनंद आहे.

परवा रशियाचे ‘लुना-२५’ यान चंद्रावर उतरण्याआधीच कोसळले होते, त्या पार्श्वभूमीवर आज चंद्रयान ३ चे यश हे संपूर्ण जगात उजळून निघाले आहे.

भारत आज महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, त्यामुळे आजचे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरले आहे, या मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

असं म्हणत त्यांनी चंद्रयान ३ मोहीमेमधील विक्रम लॅन्डरच्या यशस्वी लॅंडिंगबद्दल समस्त भारतीयांचं आणि शास्त्रज्ञांचं अभिनंदन केेलंं आहे. दरम्यान, भारताच्या चांद्रयानाचं विक्रम हे लँडर यशस्वीरित्या उतरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या उत्स्फूर्त भावना व्यक्त केल्या.

इस्त्रोच्या कमांड सेंटरमधून सुरु असलेले प्रक्षेपण ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी पाहिले. मुख्यमंत्र्यांसह उपस्थित सर्वानीच आनंदाने टाळ्या वाजवून ही मोहीम फत्ते झाल्याबद्धल मिठाई वाटून आनंद साजरा केला.

Leave a Comment