मुंबईत तीन अतिरेकी; मुंबई पोलिसांना आला फोन

Photo of author

By Sandhya

दुबईमधून तीन व्यक्ती मुंबईत आल्या असून ते अतिरेकी आहेत. तसेच त्यांचा पाकिस्तानशी संबंध असल्याचा दूरध्वनी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला शुक्रवारी आला होता. याप्रकरणानंतर सर्व यंत्रणांना माहिती देण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई नियंत्रण कक्षाच्या दक्ष नागरिक बुथवर शुक्रवारी दुपारी हा दूरध्वनी आला होता. राजा ठोंगे नावाच्या व्यक्तीच्या मोबाइलवरून हा दूरध्वनी करण्यात आला होता. दुबई येथून तीन व्यक्ती मुंबईत आल्या आहेत. ते अतिरेकी असून त्यांचा पाकिस्तानशी संबंध असल्याचे दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने सांगितले.

यापैकी एका व्यक्तीचे नाव मुजिब मुस्तफा सय्यद असल्याचे त्याने सांगितले. तसेच दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने तीन दूरध्वनी क्रमांक व वाहन क्रमांकही दिले आहेत. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने आपण पुण्यातून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर नियंत्रण कक्षाने अधिक माहिती घेण्यासाठी संबंधित क्रमांकावर दूरध्वनी केला होता. मात्र दूरध्वनी लागला नाही.

याबाबतची माहिती गुन्हे शाखेला देण्यात आली असून त्याबाबत अधिक तपास करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून नियंत्रण कक्षाला खोटी माहिती देणारे अनेक दूरध्वनी येत आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणांवरील ताण वाढत आहे.

Leave a Comment