नीरा नदीत प्रचंड दुर्गंधी : पाण्यावर मासे तरंगतायेत 

Photo of author

By Sandhya

नीरेच्या प्रदुषणात वाढ 

नीरा शहरात नदीकाठच्या पाण्यात मृत मासे तरंगताना आढळून आले

नीरा नदीच्या प्रदुषणात वाढ होताना दिसून येत आहे. बुधवार दि. ५ रोजी सकाळी व्यायामासाठी चालत जाणाऱ्या लोकांना नदित मृत मासे तरंगताना आढळून आले. त्या परिसरात प्रचंड दुर्गंधी येत होती. नीरा शहरात नदीकाठच्या पाण्यावर मासे तरंगताना पहिल्यांदाच पाहण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. 

बारामतीच्या होळ परिसरात नीरा नदिचे पाणी काळे झाल्याचे व मृत मासे तरंगतानाची बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे नीरा (ता.पुरंदर) मधिल नीरा नदी बचाव समितीचे कार्यकर्ते सतर्क झाले आहेत. अशा परिस्थितीत लोकांनी त्यांना नीरा शहर परिसरातही मृत मासे तरंगताना दिसल्याचे सांगितले. प्रत्यक्ष पाहणी केली असता मृत मासे तरंगत असल्याचे नीरा नदी बचाव समितीचे सचिन मोरे यांनी सांगितले. 

नीरा नदीच्या काठावरील स्मशानभूमी शेजारील घाटावर मृत मासे पाण्यावर तरंगताना दिसून आले. नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाच्या पश्चिम बाजूला नीरा शहराचे गटारीचे मैला युक्त पाणी नदीत येत असते. हे पाणी पुर्व बाजूला वाहून स्मशानभूमीच्या घाटात येते. त्याठिकाणी नेहमीच प्रचंड घाणीचे साम्राज्य असते. आता उन्हाळ्यामुळे पाण्याचे तापमान वाढ तसेच मैला युक्त पाणी यामुळे मिथेन वायू निर्माण होत असल्याने माशांना ऑक्सिजन कमी पडत असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पुणे जिल्ह्यातील शेवटचा विसावा नीरा नदीच्या किनारी असतो. विसाव्या पासून शंभर मिटर अंतरावर मैला मिश्रित पाणी आहे. पालखी सोहळ्या दरम्यान लोक नीरा नदीत अंघोळ करुन स्वच्छता करातात. आता याठिकाणी लोकांनी पाण्यात जाणे धोकादायक झाले आहे. 

“आम्ही २०१२ साली ग्रामपंचायती मार्फत तत्कालीन पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे शहराच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एक पथदर्शी प्रकल्प मांडला होता. नदीत थेट पाणी सोडणे हे पुढे धोकादायक असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. या पायलट प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करावा असे ही लेखी म्हणने मांडले होते. पण ; यावर कोणतीच कारवाई झाली नसल्याने आजचा प्रकार घडला आहे.” 

Leave a Comment