पॅनकार्ड अपडेटच्या बहाण्याने 13 लाख 86 हजारांचा गंडा

Photo of author

By Sandhya

पॅनकार्ड अपडेटच्या बहाण्याने 14 लाखांचा गंडा

पॅनकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठाला 13 लाख 86 हजारांचा आर्थिक गंडा घातला. याप्रकरणी, उंड्री येथील 72 वर्षीय व्यक्तीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार सायबर चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हे एका कंपनीतून चार्टर्ड अकाऊंटन्ट पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. 72 वर्षीय पत्नीसह ते उंड्री परिसरात राहत असून, त्यांची दोन्ही उच्चशिक्षित मुले अमेरिकेत नोकरीच्या निमित्ताने राहण्यास आहेत. सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी काही रक्कम शिल्लक ठेवली होती.

पती-पत्नीचे महंमदवाडी येथील अ‍ॅक्सिस बँकेत खाते असून, त्यांच्या खात्यावर कोणताही व्यवहार झाल्यास त्याचे मेसेज त्यांना मोबाईलवर येतात. 17 नोव्हेंबरला त्यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हॉटसअ‍ॅपवर मेसेज आला व काही वेळात फोनदेखील आला.

संबंधित फोनवर बोलणार्‍या व्यक्तीने तुम्ही पॅनकार्ड अपडेट केलेले नसून तुमची बँक खाती ब्लॉक करणार असल्याचे सांगितले. हे टाळण्यासाठी‘मोबाईलवर‘एपीके’ हे अप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगून पॅनकार्ड अपडेट करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार तक्रारदार हे प्रक्रिया करत गेल्यावर त्यांना आरोपींनी त्यांच्या व्हॉटसअपवर एक लिंक पाठवली.

त्यानुसार सदर अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड झाले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने फोनवरून बोलणे बंद केले. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांच्या बँक खात्यावरून तब्बल 13 लाख 86 हजार रुपये आरोपींनी परस्पर काढून घेतले.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, फिर्यादी यांनी तत्काळ सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सायबर पोलिसांनी‘पेयू’ कंपनीस तत्काळ मेलद्वारे पत्रव्यवहार केल्याने त्यांच्या पत्नीच्या खात्यावर एक लाख 98 हजार रुपये पे मर्चंट कंपनीकडून परत आले.

मात्र, उर्वरित 11 लाख 88 हजार रुपये तक्रारदार यांचे बँक खात्यावर परत आलेले नाहीत. त्यामुळे याप्रकरणी अज्ञात सात मोबाईलधारकांविरोधात कोंढवा पोलिसांनी आर्थिक फसवणुकीचा व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.

Leave a Comment