परवानगी नाकारली असताना सभा आयोजित केल्याप्रकरणात संभाजी भिडे यांच्यासह 150 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Photo of author

By Sandhya

परवानगी नाकारली असताना देखील सभा आयोजित केल्याप्रकरणात शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे, राजेंद्र आव्हाळे, राहुल उंद्रे, बाळासाहेब नेवाळे यांच्यासह 150 जणांविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिस कर्मचारी रितेश नाळे यांनी या संदर्भात लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नगर रस्त्यावरील मांजरी कोलवडी गावात माऊली लॉन्स येथे शनिवारी (2 सप्टेंबर) संभाजी भिडे यांची सभा आयोजित करण्यात आली होती.

भिडे वादग्रस्त विधाने करुन समाजात तेढ निर्माण करत असल्याने त्यांच्या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी विविध संघटना, राजकीय पक्षांकडून पोलिसांकडे करण्यात आली होती.

भिडे यांची सभा उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता. याबाबत लोणीकंद पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. मात्र परवानगी नाकारल्यानंतर भिडे यांची सभा झाल्याने पोलिसांनी रविवारी मध्यरात्री संयोजकांसह भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Comment