प्रणिती शिंदे वडिलांच्या पराभवाचा बदला घेणार?

Photo of author

By Sandhya

प्रणिती शिंदे

एप्रिल २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आमदार प्रणिती शिंदेंना मैदानात उतरविण्याची तयारी केली आहे. मोदी सरकारविरोधात रोखठोक बोलणाऱ्या आणि स्वत:ची कोणतीही संस्था ना कारखाना, त्यामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपात बदनाम न झालेला स्वच्छ चेहरा म्हणून जनमत त्यांच्यासोब येईल असा पक्षाला विश्वास आहे.

अशावेळी भाजपने मात्र सावध भूमिका घेत सोलापूर लोकसभेचा पुढचा उमेदवार कोण? याचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. माढ्यातही अशीच स्थिती असून त्याठिकाणी भाजपकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी मिळणार का? राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोण निवडणूक लढविणार याबद्दलही उत्सुकता आहे.

सोलापूर व माढा हे जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघ मोदी लाटेत भाजपच्या ताब्यात गेले. विशेष बाब म्हणजे सोलापूर लोकसभेतून दोन्हीवेळी काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना मिळालेली मते १९९९च्या निवडणुकीपेक्षा वाढलेली असतानाही त्यांचा पराभव झाला.

१९९९च्या निवडणुकीत श्री. शिंदे यांना दोन लाख ८६ हजार ५७८ मते मिळाली होती आणि या निवडणुकीत त्यांनी भाजपचे लिंगराज वल्याळ (दोन लाख ९ हजार ५८३ मते) यांचा पराभव केला होता. त्यानंतर २००४च्या पोटनिवडणुकीत प्रतापसिंह मोहिते-पाटील आणि त्यानंतर सुभाष देशमुख या मतदारसंघातून खासदार झाले.

तरीदेखील २००९च्या निवडणुकीत शिंदेंना या मतदारसंघातून मतदारांनी पुन्हा संधी दिली. त्यानंतर मात्र ॲड. शरद बनसोडे व डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी त्यांचा सलग दोनवेळा पराभव केला. आता राजकारण बदलले असून जिल्ह्यातील बहुतेक विधानसभा मतदारसंघ मोदी लाटेत भाजपकडे गेले आहेत.

त्यामुळे त्यांनी वयाचे कारण पुढे करीत तरुणांना संधी मिळावी म्हणून आपण राजकारणातून निवृत्त झाल्याचे जाहीर केले. आता त्यांच्या पराभवाचा वचपा काढण्याची जबाबदारी प्रणिती शिंदेंवर असणार आहे. पण, अद्याप भाजपकडून महास्वामीच असणार की नवीन उमेदवार दिला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

७० हजार मतांची तूट भरून काढावी लागणार सोलापूर लोकसभा मतदारसंघात शहर मध्य, शहर उत्तर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळ या विधानसभा मतदारसंघासह पंढरपूर-मंगळवेढ्याचा काही भाग येतो. लोकसभेला सरासरी साडेदहा लाखांपर्यंत मतदान होते. त्यात सुशीलकुमार शिंदेंना १९९९ मध्ये दोन लाख ८६ हजार ५७८ मते मिळाली होती.

२००९मध्ये ते ज्यावेळी दुसऱ्यांना खासदार झाले, त्यावेळी त्यांचे मतदान एक लाखांनी (३,८७,५९१) वाढले होते. पण, त्यानंतरच्या दोन्ही निवडणुकीत त्यांना जवळपास तेवढीच मते मिळाली, पण मताधिक्य वाढले नाही. २०१४च्या निवडणुकीत श्री. शिंदेंना तीन लाख ६८ हजार २०५ तर २०१९च्या निवडणुकीत तीन लाख ६५ हजार २७४ मते मिळाली.

दोन्हीवेळी विरोधी उमेदवाराने पाच लाखांहून अधिक मते घेतली. याचा अभ्यास करून आता काँग्रेस उमेदवाराला पूर्वीची मते टिकवून किमान ७० ते ८० हजार मते जादा घ्यावी लागणार आहेत. त्यासाठी मतदारसंघातील कानाकोपऱ्यात जाण्याची तयारी करावी लागणार आहे. त्याशिवाय खासदारकीचे त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही, अशी स्थिती आहे.

माढ्यात मोहिते-पाटलांची भूमिका निर्णायक माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाज निर्णायक मानला जातो. या मतदारसंघातून ‘रासप’चे महादेव जानकर हेही उमेदवार असून शकतात.

दुसरीकडे भाजप पुन्हा रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना संधी देईल, पण त्यासाठी विजयसिंह मोहिते-पाटलांची भूमिका महत्त्वाची असेल, अशी चर्चा आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा असून त्याठिकाणी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे २००९ मध्ये पाच लाखांवर मते घेऊन खासदार झाले होते.

त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत विजयसिंह मोहिते-पाटील यांनाही तेवढीच मते मिळाली होती. २०१९मध्ये मात्र राजकीय समीकरणे बदलली आणि त्याठिकाणी रणजितसिंह नाईक-निंबाळकरांची लॉटरी लागली. आता या मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण असणार आणि त्याविरोधात राष्ट्रवादीचा तगडा उमेदवार कोण? यावरही खूपकाही अवलंबून असणार आहे.

Leave a Comment