कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन 40 वर्षीय महिलेवर बलात्कार करणार्या एकाला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान पीडित महिलेने मारहाणीची तक्रार दाखल केल्याच्या रागातून जातिवाचक शिव्या दिल्याने अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन यशवंत शिंदे (वय 43, रा. एनडीए रोड, शिवणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
ही घटना 8 मे 2023 आणि 20 जून 2023 रोजी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी हे ओळखीचे आहेत. आरोपी सचिन शिंदेने पीडित महिलेला वारजे येथे नेऊन पिण्यासाठी कोल्ड्रिंक दिले. यानंतर महिलेला गरगरल्यासारखे झाले.
त्या वेळी आरोपीने संमतीशिवाय शरीरसंबंध ठेवून त्याचे फोटो काढले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा बलात्कार केला. तसेच पीडित महिला या दुचाकी चालवायला शिकत असताना शिवीगाळ केली होती. पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त भीमराव टेळे करत आहेत.