PUNE : मासळी बाजाराच्या विरोधात मूक मोर्चा

Photo of author

By Sandhya

मासळी बाजाराच्या विरोधात मूक मोर्चा

गुलटेकडी मार्केट यार्ड परिसरातील वाहनतळावरील जागेवर मासळी बाजार उभारण्याचा प्रस्ताव रद्द करण्याची सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पणनमंत्री अब्दुल सत्तार यांना केल्याची माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली.

स्थानिक नागरिकांनी आणि व्यापार्‍यांनी मासळी बाजाराचा प्रस्ताव रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयावर सकाळी मूक मोर्चा काढला.

आठवडाभरात निर्णय न झाल्यास, समिती बरखास्त करण्याची मागणी करू, असा इशारा माधुरी मिसाळ यांनी मोर्चाच्या समारोपाच्या वेळी दिला होता. सकल सर्वधर्म पुणे परिवाराच्या वतीने हा मोर्चा आयोजिण्यात आला होता.

सर्वपक्षीय नेत्यांनी, तसेच बाजार समितीच्या काही संचालकांनी त्याला पाठिंबा दिल्याने, हा प्रस्ताव रद्द होण्याची शक्यता वाढली होती. त्यानंतर मिसाळ यांनी थेट फडणवीस यांच्याशी संपर्क साधला.

कृषी उत्पन्न बाजार समितीने गुलटेकडी मार्केट यार्ड येथील एका भूखंडावर मासळी बाजार उभारण्याचा प्रस्ताव गेल्या महिन्यात मंजूर केला होता. त्याची माहिती समजल्यानंतर, त्या परिसरात राहणार्‍या सोसायटीतील रहिवाशांनी त्याला विरोध करीत प्रस्ताव तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन उभारले.

पुणे मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठीया, प्रवीण चोरबेले, रायकुमार नहार, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, अभय छाजेड, श्रीना़थ भिमाले, तसेच फत्तेचंद रांका, डॉ. कल्याण गंगवाल यांच्यासह अनेक जण मोर्चात सहभागी झाले.

बाजार समितीने संचालक गणेश घुले, संतोष नांगरे, बापू भोसले यांनी या ठरावाला विरोध केल्याचे सांगितले, तसेच समितीच्या आगामी बैठकीत तो रद्द करण्याचे आश्वासन या वेळी दिले.

Leave a Comment