मोदी सरकारने भंगार विकून कमावले ६००कोटी

Photo of author

By Sandhya

मोदी सरकारने भंगार विकून कमावले ६००कोटी

केंद्रातील मोदी सरकारवर कर्जाचे ओझे असल्याचा आरोप विरोधक वारंवार करत असतात मात्र आता केंद्राची तिजोरी मालामाल झाली असल्याची माहिती समोर येत आहे. आणि तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल कि ही कोट्यवधींची संपत्ती सरकारने केवळ रद्दी विकून जमवली आहे.

होय केंद्र सरकारने आपल्या सरकारी कार्यालयातील बिनकामी फाईल्स आणि जुन्या कार्यालयीन वस्तू, पेपर रद्दी, जुनी असलेली वाहने विकून तब्बल ६०० कोटींची रक्कम गोळा केली आहे.

ऑगस्टपासून आतापर्यंत अवघ्या दीड महिन्यात सरकारने ६०० कोटी रुपये कमावले आहेत. ऑक्टोबरपर्यंत ही रक्कम १००० कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली आहे.

सुमारे दोन वर्षांपूर्वी मोहिमेला सुरुवात झाल्यापासून जवळपास ३१ लाख बिनकामी असणाऱ्या सरकारी फायली बाहेर काढल्या गेल्या आहेत. सरकारने रद्दी विकून देशाची ऐतिहासिक असणाऱ्या चांद्रयान-३ या मोहिमेच्या खर्चाचा आकडा गाठला आहे.

सरकारने रद्द केलेल्या  फायली,  बिनकामाची कार्यालयीन उपकरणे आणि भंगाराच्या विक्रीतून ऑक्टोबरपर्यंत हा आकडा 1,000 कोटींच्या पुढे जाऊ शकतो असे म्हटले आहे.

सरकार आपली ही विशेष मोहीम 2 ऑक्‍टोबर ते 31 ऑक्‍टोबरपर्यंत राबवणार असून, त्यात स्वच्छता आणि प्रशासनातील प्रलंबितता कमी करणे यावर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे. 

एका उच्च सरकारी अधिकाऱ्याने एका वृत्तवहिनीला दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अशाच मोहिमेतून सरकारने 371 कोटी रुपये कमावले गेले होते, तर तिसर्‍या आवृत्तीचे लक्ष्य यंदा जवळपास 400 कोटी रुपयांच्या महसुलावर पोहोचले आहे.

ऑक्टोबर 2021 मध्ये अशा पहिल्या प्रयत्नात सरकारने 62 कोटी रुपये कमावले होते. शेवटची मोहीम नोव्हेंबरमध्ये संपवण्यात आली होती. दरम्यान, सरकारला स्वच्छता मोहिमेद्वारे प्रत्येक महिन्याला सुमारे 20 कोटी रुपये मिळतात. 

सरकारच्या या मोहिमेमुळे सरकारी कार्यालयातील कॉरिडॉर स्वच्छ करण्यात येतात. त्यानुसार आजपर्यंतच्या जागेचे प्रमाण आजपर्यंत तब्बल 185 लाख चौरस फूट आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यात आलेल्या मोहिमेमध्ये 90 लाख चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली होती. यावर्षी 100 लाख चौरस फूट जागा रिकामी करण्याची योजना आखली जात आहे.

मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात सर्व मंत्रालये आणि विभाग सहभागी होतील. तयारीचा टप्पा 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर असा असेल आणि अंमलबजावणीचा टप्पा 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत सुरू होईल. राज्यमंत्री केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह 14 सप्टेंबर रोजी दिल्लीतून या मोहिमेची घोषणा करणार आहेत.

Leave a Comment