पुणे : भिशीतील सदस्याने व्यवसायासाठी चार कोटी उकळल्यानंतर पैशांची परत मागणी करणार्या महिलेवर बंदुकीच्या धाकाने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना कोंढवा येथे घडली असून, चौघांविरुध्द कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी एका 48 वर्षीय महिलेने फिर्याद दिली. पोलिसांनी जुगनू ऊर्फ शफीक शेख (45), मुश्ताक मोमीन (46), केतन, व महाराजविरुध्द अनैसर्गिक अत्याचार, बलात्कार आदी कलामांतर्गत गुन्हा दाखल केला.
पीडित महिला आणि जुगनू शेख हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. भिशीनिमित्त त्यांची ओळख झाली होती. त्यांची भिशी 2020 मध्ये बंद पडल्यावर त्याने पीडित महिला आणि तिच्या मैत्रिणीला आपण दुसरा काही व्यवसाय करू, असे सांगितले. यानंतर दोघींकडून 50 लाखांचे सहा हप्ते, असे चार कोटी व्यवसायासाठी गुंतवणूक म्हणून घेतले.
आर्थिक फसवणूक झाल्याने पीडित महिला त्याच्या घरी पैसे मागायला गेली होती. त्या वेळी त्याने बंदुकीचा धाक दाखविला. पीडितेशी जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध ठेवले. याचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. यानंतर ब्लॅकमेल करीत वारंवार अत्याचार केलेे.