राहुल नार्वेकर : सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईननुसारच कार्यवाही…

Photo of author

By Sandhya

राहुल नार्वेकर

ठाकरे गटाकडून जे कागद दाखविले जात आहेत त्यात कुठेच पक्षाच्या घटनादुरुस्तीचा उल्लेख नाही. खोटे बोल पण रेटून बोलचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच अपात्रतेचा निकाल दिल्याचा दावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी केला.

शिवाय, अर्धवेळ आणि अर्धवट अध्यक्षांकडून राजकीय पक्षसंघटना चालविण्यासारखे गंभीर काम होऊ शकत नाहीत, असा जोरदार टोलाही नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाने महापत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला.

त्यानंतर लागलीच नार्वेकरांनी खुलाशाची पत्रकार परिषद घेत ठाकरे गटावर निशाणा साधला. नार्वेकर यांनी या पत्रकार परिषदेत त्यांच्यावरील आरोपांवर मुद्देसूद उत्तरे दिली. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या चौकटीतच अपात्रता याचिकांवर निकाल दिला आहे, असे सांगून न्यायालयाच्या सूचनांचे तंतोतंत पालन केल्याचा पुनरूच्चार नार्वेकर यांनी यावेळी केला.

ठाकरे गटाची आजची महापत्रकार परिषद म्हणजे दसरा मेळावा होता की गल्लीबोळातील भाषणांची मालिका? संवैधानिक संस्थांवर आरोपांची राजकीय भाषणे, शिवीगाळ इतकेच त्याचे स्वरूप होते. ज्यांचा संवैधानिक संस्थांवर विश्वास नाही त्यांना संविधानावर बोलण्याचा अधिकार नसल्याचेही नार्वेकर म्हणाले. ठाकरे गटाने 2013 आणि 2018 च्या पक्षांतर्गत निवडणुकांचे व्हिडीओ दाखविले.

जेंव्हा मी शिवसेनेत होतो तेंव्हाचेही चित्रण दाखविले गेले. त्या व्हिडीओबाबत शंका उपस्थित करतानाच मी शिवसेनेत होते तेंव्हा माझ्याकडे त्यांची घटना शिक्कामोर्तब करण्याचे काम नव्हते, ती त्यांचीच जबाबदारी होती. तेंव्हाच्या आठवणींवरून नाही तर सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करत निकाल दिला असल्याचेही नार्वेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

2013 आणि 2018 सालची घटनादुरूस्ती निवडणूक आयोगाला कळविली होती, असा दावा करत ठाकरे गटाने पोच मिळाल्याचे शिक्के असणारे पत्र आज फडकाविले. त्यावर, ठाकरे गट फक्त कागद फडकावित आहे. त्या कागदात काय लिहिले आहे ते मात्र सांगितले जात नाही. त्या दोन्ही पत्रांमध्ये शिवसेनेच्या घटनादुरूस्तीबाबत चकार शब्द लिहिलेला नाही.

पक्षांतर्गत निवडणूक कार्यक्रमांचा फक्त निकालच त्या पत्राद्वारे निवडणूक आयोगाला कळविण्यात आला होता. घटनादुरूस्तीचा साधा उल्लेखही त्या पत्रांमध्ये नव्हता असे सांगत नार्वेकर यांनी ती दोन्ही पत्रे वाचून दाखविली. निवडणूक आयोगाला घटना सादर केल्याचा ठाकरेंचा दावा खोटा असल्याचेही नार्वेकर म्हणाले.

माझ्या समोरील सुनावणीतही याबाबत ठाकरे गटाने चकार शब्द काढला नव्हता असेही नार्वेकर म्हणाले. अर्धवट अध्यक्ष आणि कंपाऊंडच्या शस्त्रक्रीया राजकीय पक्ष चालविणे हे जबाबदारीचे काम आहे. पक्षाचे नियम, घटना कागदावर लिहून कपाटात ठेवण्यासाठी नाही तर अंमलबजावणीसाठी असतात.

राजकीय पक्षांना आता ही बाब गांभीर्याने घ्यावी लागणार आहे. अर्धवट किंवा पार्टटाईम अध्यक्ष ही अशी महत्वाची कामे करू शकत नाहीत. त्यासाठी पूर्णवेळ झोकून द्यावे लागते. पण, कंपाऊडर शस्त्रक्रीया करू लागले तर काय निकाल लागतो हे समोर आहे, असा टोलाही नार्वेकर यांनी लगावला.

धमक्या हेच त्यांचे संविधान राहुल नार्वेकरांनी पोलिसांची सुरक्षा सोडून मैदानत येऊन दाखवावे या आव्हानावर नार्वेकर म्हणाले की, त्यांच्या संविधानाचा असाच अर्थ असावा. शिविगाळ करणे, धमक्या देणे, असंसदीय शब्द वापरणे याच कदाचित त्यांच्या लेखी संविधानातील तरतुदी असाव्यात, असे उत्तर नार्वेकर यांनी दिले.

Leave a Comment