शरद पवार : स्वातंत्र्य चळवळीत कोल्हापूर जिल्ह्याचे मोठे योगदान

Photo of author

By Sandhya

शरद पवार

स्वातंत्र्य चळवळीत कोल्हापूर जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. यशवंतराव चव्हाण, दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार, पी. बी. पाटील यांच्यासह अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात लाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला, आंदोलनाच्या झळा सोसल्या. त्यामुळे आज आपल्याला आनंदाचे दिवस आले आहेत.

स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास कुंभार व पाटील यांचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होणार नाही. त्यांचे विचार चिरंतर ठेवण्यासाठी आपण सर्वांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काढले.

निमशिरगाव (ता. शिरोळ) येथे स्वातंत्र्यसेनानी पी. बी. पाटील निमशिरगाव विकास सेवा सोसायटी नामकरण व स्वातंत्र्यसेनानी साहित्यिक स्व. पी. बी. पाटील महसूल भवन इमारत पायाखोदाई कार्यक्रम पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते मंगळवारी झाला.

यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, रत्नाप्पाण्णांच्या स्मारकासाठी सरकारने 5 कोटी दिले आहेत, मात्र अजून निधी आवश्यक आहे, तो राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी उपलब्ध करावा.

आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, निमशिरगावची स्वातंत्र्यसेनानी म्हणून ओळख आहे. तालुक्याच्या विकासासाठी स्व. दे. भ. कुंभार, सा. रे. पाटील, शामराव पाटील-यड्रावकर, पी. बी. पाटील यांनी साखर कारखाने, पाणी योजना, सेवा संस्था काढून तालुक्याची वाटचाल यशस्वी केली. आ. सतेज पाटील म्हणाले, स्व. दे. भ. कुंभार, सा. रे. पाटील, शामराव पाटील-यड्रावकर अनेक वर्षे कोल्हापूर जिल्ह्याचे नेतृत्व केले.

त्यामुळे सेवा संस्था, साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतकर्‍यांसह सर्वांना न्याय मिळाला. आ. जयंत पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्हा म्हणजे नेतृत्वाची खाण असणारा जिल्हा आहे. त्यामुळेच कोल्हापूरचा चौफेर विकास झाला आहे.

यावेळी माजी आ. उल्हास पाटील, राजीव आवळे, दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील, दलितमित्र डॉ. अशोकराव माने, पृथ्वीराज यादव, तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे, चंद्रकांत जाधव घुणकीकर, महावीर पाटील, कलगोंडा पाटील, स्वस्तिक पाटील, सुप्रिया सावंत उपस्थित होते. स्वागत सरपंच अश्विनी गुरव तर प्रास्ताविक पद्माकर पाटील यांनी केले.

आभार अजित सुतार यांनी मानले. ना. मुश्रीफ व शेट्टी यांची दांडी हा कार्यक्रम पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षेखाली होणार होता. मात्र त्यांनी माझा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने उपस्थित राहू शकत नसल्याचा निरोप देऊन शुभसंदेश पाठविला. राजू शेट्टी हे वासिम व जालना येथे कार्यक्रमासाठी गेल्याने उपस्थित नव्हते.

मी 84 वर्षांचा तरुण… खा. धैर्यशील माने यांनी भाषणात आजच्या कार्यक्रमात तरुण मान्यवर लाभले असल्याचा उल्लेख केला. यावर पवार यांनी खासदार माने यांचे भाषण थांबवून मी 84 वर्षांचा तरुण असल्याचे उत्तर दिल्यानंतर सभास्थळी मोठा हास्यकल्लोळ झाला.

Leave a Comment

You cannot copy content of this page