
राज्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्यात याव्यात यासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. काल पुण्यात या मुद्द्यावर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते,
मनसे कार्यकर्त्यांनी काही दुकानांच्या पाट्यांची तोडफोड देखील केली. यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
आज मुख्यमंत्र्यांचे शासकिय निवासस्थान असलेल्या वर्षा बंदल्यावर राज ठाकरेंसोबत मनसे आमदार राजू पाटीलही सोबत आले होते. तर काही दिवसांपूर्वी टोल नाक्यांसंबंधी आंदोलनानंतर देखील राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.
राज्यातील टोल नाके आणि दुकानावरील मराठी पाट्यांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी ही भेट घेण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
पुण्यात मनसे आंदोलकांवर गुन्हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपल्यानंतर देखील दुकानांवर इंग्रजी पाट्यांएवजी मराठी पाट्या लावण्यास उशीर होत असल्याने मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती.
पुण्यात मराठी पाट्या न लावलेल्या दुकानांची मनसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली. यावेळी पोलिस आणि मनसैनिकांमध्ये झटापट देखील झाली.
याप्रकरणी शहराध्यक्ष साईनाथ बाबर, राजेंद्र वागस्कर यांच्यासह २० ते २२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विश्रामबाग आणि डेक्कन पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती. ती उलटून गेल्यानंतर आता महानगरपालिका प्रशासन मराठीत पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करू शकते.