Pune : धायरीकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका

Photo of author

By Sandhya

धायरीकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या सिंहगड रस्ता ते सावित्री गार्डन मंगल कार्यालय या तीस मीटर डीपी रस्त्याचे काम अखेर जागामालकांच्या सहकार्याने मार्गी लागणार आहे. या रस्त्यातील बाधित जागामालकांना टीडीआर व एफएसआय स्वरूपात महापालिकेकडून मोबदला देण्यात येणार असल्याची माहिती पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावस्कर यांनी दिली.

महापालिकेचे अधिकारी, बाधित जागामालक आणि नागरिकांची या रस्त्यासंदर्भात शुक्रवारी बैठक झाली. तसेच या रस्त्याची पाहणीही करण्यात आली. या वेळी पावस्कर बोलत होते. आमदार भीमराव तापकीर यांच्या प्रयत्नातून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

कुणाचेही नुकसान न करता रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी या वेळी जागामालकांनी केली. हा रस्ता तीस मीटर रुंद व तेराशे मीटर लांब आहे. टीडीआर व एफएसआय स्वरूपात जागामालकांना मोबदला देण्यात येणार आहे. या जागामालकांनी संमती दिल्याने येत्या आठ ते पंधरा दिवसांत या रस्त्याचे काम सुरू होणार असल्याचे पावस्कर यांनी सांगितले.

या रस्त्यामुळे धायरी परिसरातील होणारी वाहतूक कोंडी सुटण्यासाठी मदत होणार आहे. तसेच या रस्त्याचे काम करताना मुठा कालव्यावर व बेबी कालव्यावर पुलाची कामे करण्याबाबतही या वेळी चर्चा करण्यात आली.

आ. तापकीर, पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे, कार्यकारी अभियंता अमर शिंदे, उपअभियंता नरेश रायकर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत मोरे, उपअभियंता विजय कुमावत, इमारत निरीक्षक महेश झोमन, जागामालक बाळासाहेब पोकळे, पंढरीनाथ पोकळे, यशवंत लायगुडे, अतुल चाकणकर, नीलेश चाकणकर,कुणाल पोकळे, संतोष चाकणकर, दादासाहेब पोकळे, शेखर शिंदे, गणेश पोकळे आदी या वेळी उपस्थित होते.

पुढील वर्षी काम पूर्ण होेणार या रस्त्याच्या भूसंपादनासाठी जागामालकांनी संमती दिल्याने या कामाची निविदा लवकरच काढली जाईल. निविदा मंजूर झाल्यानंतर प्राथमिक ताबे मारून जागेवर खोदाईचे काम सुरू करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात नऊ मीटर बाय आठशे मीटर रस्ता करण्यात येणार आहे. पुढच्या वर्षात रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. रस्त्याच्या आखणी व सर्व्हे नंबरच्या हद्दीबाबत कोणाचीही हरकत असल्यास समक्ष जागेवर जाऊन हद्दी कायम करून याबाबत मार्ग काढण्यात येणार असल्याचे अनिरुद्ध पावस्कर यांनी सांगितले.

Leave a Comment