राजकारण्यांच्या नादी लागू नका; कायदेशीर बाजू देखील समजून घेतल्या पाहिजे, राज ठाकरेंचा सल्ला

Photo of author

By Sandhya

राज ठाकरे

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर जालन्यामधील अंतरवाली सराटी गावात पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले. यात महिलांचा देखील समावेश आहे. या घटनेनंतर मराठा समाज आक्रमक झाला असून सर्व स्तररातून संताप व्यक्त केला जात आहे.

अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज जालन्यामधील अंतरवाली सराटी गावात जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यावेळी राज ठाकरे यांनी राजकारण्यांच्या नादी लागू नका असा सल्ला दिला आहे.

याशिवाय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे. “मी या घटनेचे व्हिडिओ पाहिले आहेत. ते मला बघवलं नाही. आता यांनी मला काही विषय सांगितले आहेत.

मी लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर घालेन. त्याचं काय होईल माहीत नाही. मला खोटं बोलता येत नाही. खोटी आमिषं दाखवता येत नाही. मी मुख्यमंत्र्यांशी, तज्ज्ञांशी बोलेन आणि विषय सोडण्यासारखा असेल तर नक्की सोडवू,” असं आश्वासन राज ठाकरेंनी आंदोलकांना दिलं.

पुढे राज ठाकरे म्हणाले की,  “सगळे राजकारणी तुमचा वापर करुन घेतील. ज्यावेळी मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्या तुमच्यापर्यंत चुकीच्या पोहोचवल्या गेल्या. मी मागेही बोललो होतो की मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, राजकारणी तुमचा वापर करतात.

कायद्याने गोष्टी समजून घ्या. आरक्षणाचे आमिष तुम्हाला दाखवले जातील. सत्तेत आल्यावर तुमच्यावर गोळ्या घालतील. हे जेव्हा विरोधी पक्षात असतात तेव्हा तुमच्यावर प्रेम येतं.

झालेल्या घटनेत पोलिसांना दोष नका देऊ, ज्यांनी त्यांना आदेश दिला त्यांना दोष द्या,” असंही राज ठाकरे यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला.

“देवेंद्र फडणवीस म्हणाले, झालेल्या गोष्टीचं कोणी राजकारण करु नका. पण हेच जर विरोधी पक्षात असते तर यांनी काय केलं असतं हेच केलं असतं ना. मी काय राजकारण करायला आलेलो नाही.

पण राजकारण्यांच्या नादी लागू नका हे मी आधीच सांगितले आहे. कायदेशीर बाजू देखील समजून घेतल्या पाहिजे. मला बाकीच्या लोकांसारखे खोटे बोलता येत नाही,” असे राज ठाकरे म्हणाले.

Leave a Comment