पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे प्रचारक बनून ४०० पारच्या घोषणा देत फिरत होते, पण २०० पार होणे त्यांना जड जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पाहता ही गोष्ट त्यांच्यासुद्धा लक्षात आली असून मोदी कार्ड महाराष्ट्रात चालणार नाही, हे स्पष्ट आहे, असा दावा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला.
महाविकास आघाडीचे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भूषण पाटील यांच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी पत्रकार परिषदेत चेन्नीथला म्हणाले, शरद पवारांसारख्या वरिष्ठ नेत्याला पंतप्रधान मोदी भटकता आत्मा म्हणतात.
देशाच्या पंतप्रधानपद भूषवत असलेल्या व्यक्तीला अशा प्रकारचे वक्तव्य शोभा देते का? शिवसैनिक तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असेही ते म्हणाले.
पेडर रोडचे पार्सल परत पाठवू भाजपने उत्तर मुंबईमध्ये उभे केलेले पेडर रोडचे पार्सल परत पेडर रोडला पाठवून येथील भूमिपुत्र भूषण पाटील यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणावे, असे आवाहन खा. संजय राऊत यांनी केले.
मासेमारी करणे येथील कोळी बांधवांचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे. कोळी बांधव मूळ भूमिपुत्र आहेत आणि या भूमिपुत्रांची आणि त्यांच्या व्यवसायाचा भाजपने अपमान केला आहे.
जर तुमच्या नाकाचे केस जळत असतील तर तुम्ही गुजरातला जाऊन निवडणूक लढवा, महाराष्ट्रात निवडणूक लढवायचा त्यांना अधिकार नाही, अशी टीका राऊत यांनी केली.