मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या संपत्तीबाबत विचारले असल्याचा आरोप केला होता. त्या आरोपाला प्रत्युत्तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले. आनंद दिघे यांची खरी संपत्ती असलेला आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदे यांनी हडपल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारसभेत मंगळवारी (ता. ७) ते बोलत होते. नरेंद्र मोदी हे नकली फकीर असून खरे फकीर हे आनंद दिघे होते, असेही राऊत यांनी यावेळी सांगितले. आनंद दिघे यांनी गद्दारांना क्षमा नाही, असे म्हटले होते.
हा विचार ४ जूननंतर ठाण्यात अमलात आणायचा असल्याचा घणाघातदेखील राऊत यांनी केला. तसेच आनंद दिघे यांच्यावर आधारित तयार केलेला खोटा चित्रपट हा त्यांचा अपमान आहे. ठाणेकर अशा व्यक्तींना माफ करणार नाहीत, असेही राऊत यांनी म्हटले.
राज्यात दोन ठिकाणी प्रचार करण्याची गरज नाही. एक ठाणे आणि दुसरे बारामती. येथे प्रचार करण्याचा प्रश्नच येत नाही. येथील घटनाबाह्य मुख्यमंत्री मोदींच्या सहवासात गेल्यापासून खोटं बोलायचे, रेटून बोलायचे, असे वागत आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या मुलाला ठाण्यातच उभे करायला पाहिजे होते. ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे तिथे मशालच विजयी होणार असून चोरीचा माल पचणार नसल्याची टीकाही त्यांनी केली.
ब्रिटिशांनी लुटला नसेल एवढा देश या लोकांनी दहा वर्षांत लुटला आहे. कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराज यांचा पराभव व्हावा, म्हणून मुख्यमंत्री पैसे वाटत होते.
कोल्हापूरच्या एका हॉटेलमध्ये मुख्यमंत्री शंभर कोटी घेऊन बसले होते, असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला. दरम्यान, भाजप देशात दीडशे पण जागा पार करू शकत नाही. इंडिया आघाडीच्या देशात ३२० हून अधिक जागा निवडून येण्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.