स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अभियाना अंतर्गत कचरामुक्त शहर आणि वाॅटर प्लस मानांकनामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल गुरूवारी ( दि ११ जानेवारी ) नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते झाला. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ कैलास चव्हाण, मुख्याधिकारी निखिल मोरे आणि आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण यांनी हा पुरस्कार स्विकारला. कार्यक्रमावेळी पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप उपस्थित होते.
यापुर्वी सासवड नगरपरिषदेने तत्कालीन नगराध्यक्ष चंदूकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान सन २००२ – ०३ ते २००५-०६ मध्ये पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक व २००७-०८ मध्ये उत्कृष्ट कामगिरी आणि २००७ -०८ मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
आताही स्व चंदूकाका जगताप यांच्या शिकवणी प्रमाणे कामकाज सुरू असून सासवडकर नागरिकांच्या सहकार्याने, आमदार संजय जगताप, गटनेत्या आनंदीकाकी जगताप व सर्व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ सर्वेक्षण २०१८ सासवड नगरपरिषदेला उत्कृष्ट कार्य शैली नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळाला.
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये राष्ट्रीय स्तरावर कचरामुक्त शहर व ओडीएफ शहर, २०२० मध्ये देशात दुसरा क्रमांक व स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये पहिल्या तीन क्रमांक, २०२२ मध्ये इंडियन स्वच्छता लिगमध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष सन्मान, २०२२ मध्येच राष्ट्रीय पातळीवर सेल्फ सस्टेनेबल सिटी म्हणून पुरस्कार आणि स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये कचरामुक्त शहर म्हणून थ्री स्टार मानांकन आणि वाॅटर प्लस उच्चतम मानांकन मिळवून दोन्ही मानांकनात देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
दिवंगत लोकनेते चंदूकाका जगताप यांच्या स्वच्छतेबाबतच्या आदर्शाप्रमाणे आणि आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सलग सातव्यांदा सासवड नगरपरिषद देशात अव्वल स्थान पटकावले असून सासवडकर नागरिक, पालिकेचे आजी माजी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यश असल्याचे आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण म्हणाले. आमदार संजय जगताप यांनी शहरातील नागरीक, सर्व आजीमाजी नगरसेवक, पालिकेचे अधिकारी व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले.