रवींद्र धंगेकर : गुंडाळलेला स्मार्ट सिटी प्रकल्प आम्ही मार्गी लावू…

Photo of author

By Sandhya

रवींद्र धंगेकर

केंद्र सरकारने गुंडाळलेला पुणे स्मार्ट सिटी प्रकल्प आम्ही मार्गी लावू आणि पुणेकरांना आशा लावण्यात आलेल्या प्रकल्पाची पूर्तता करू, अशी ग्वाही महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दिली.

प्रचारादरम्यान बोलताना धंगेकर म्हणाले, स्मार्ट सिटी प्रकल्पाचा बराच गाजावाजा केला, त्यामुळे पुणेकर काही प्रमाणात हुरळून गेले होते.

पण, प्रत्यक्षात मात्र पुणेकरांच्या पदरी घोर निराशाच आली आहे. हा प्रकल्प संपूर्ण पुणे शहरासाठी नव्हता तर शहरातील केवळ एक छोटा भाग विकसित करण्याचा प्रकल्प होता, हे सुद्धा पुणेकरांना उशिराने कळाले.

यासाठी पुण्यातील बाणेर- बालेवाडीचा कोपरा जो आधीच विकसित आहे तो निवडला गेला आणि तेथेही या प्रकल्पाच्या कामाची पूर्तता झाली नाही.

वास्तविक यूपीए सरकारच्या काळात जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्यूअल मिशन ही योजना राबवली गेली. त्यातून शहराच्या विकासाला 50 टक्के निधी केंद्र सरकारकडून दिला जात होता.

अत्यंत उपयुक्त अशी ही योजना बंद करण्यासाठीच केंद्रातील भाजप सरकारने स्मार्ट सिटी योजना पुढे आणली आणि जेएनएनयूआरएम ही योजना बंद पाडली.

त्यामुळे पुण्याला केंद्राकडून मिळणारा प्रत्येक प्रकल्पाच्या 50 टक्के निधी मिळू शकला नाही. स्मार्ट सिटी हे केवळ एक गाजर होते, हे नागरिकांच्या लक्षात आले. ही योजना आता बंद केल्याने पुणेकरांचे स्मार्ट सिटीचे स्वप्न अधुरेच राहिले.

मात्र, आपण खासदार झाल्यानंतर पुन्हा जेएनएनयुआरएम स्वरूपाची योजना सुरू करण्याचा आग्रह केंद्राकडे धरू, असे धंगेकर यांनी सांगितले.

धंगेकर म्हणाले, केंद्र सरकारने पुण्यात नदी सुधार योजना गाजावाजा करून हाती घेतली, त्या योजनेलाही अजूनपर्यंत वाटाण्याच्या अक्षताच लावण्यात आल्या आहेत. समान पाणीपुरवठा योजनेचा बोजवाराही अशाच पद्धतीने उडाला आहे.

शहरातील अनेक उपनगरे पाणीटंचाईने त्रस्त आहेत. नागरिकांच्या या सगळ्या घोर समस्यांना काँग्रेसचे सरकार उत्तर देऊ शकते. त्यामुळे काँग्रेसला विजयी करा आणि अर्धवट विकासकामे पूर्णत्वाकडे न्या, असे आवाहन धंगेकर यांनी केले.

Leave a Comment