एस. टी. कर्मचारी अजूनही पगारवाढीच्या वाटेवर

Photo of author

By Sandhya

एस. टी. कर्मचारी अजूनही पगारवाढीच्या वाटेवर

पगार वाढ आणि इतर कारणांसाठी संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरी पगाराच्या ऐवजी प्रतिक्षा असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी आणि अधिकारी यांना दहा तारीख उलटली तरी वेतन मिळाले नाही. त्यामुळे एसटी कर्मचारी हतबल झाले असल्याचे दिसून येत आहे.

सरकारने फक्त 165 कोटी रुपयांचा सवलत मूल्य रक्कमेच्या परताव्याचा निधी देणे, सदर निधी एसटीच्या खात्यावर जमा न होणे ही शुद्ध फसवणूक असून याला राज्य सरकारचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे.

राज्य सरकार हे संप काळात दिलेल्या आश्वासनाकडे डोळेझाक करीत असून त्यामुळे कर्मचाऱ्याना वेळेवर वेतन मिळत नाही. हे आता नित्याचेच झाले असून ही कर्मचाऱ्यांची थट्टा सुरू आहे, असा आरोप महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

एसटी  महामंडळाला वेतनासाठी दर महिन्याला 360  कोटी रुपये इतक्या निधीची गरज  आहे. मात्र, 165 कोटी इतकी कमी रक्कम महामंडळाला देणे आणि ती सुध्दा सवलत मूल्य रक्कमेतून देणे ही शुद्ध फसवणूक असल्याचे एसटी कर्मचारी काँग्रेसने म्हटले आहे. वेतनाला लागणारी पूर्ण  रक्कम बजेट मध्ये तरतूद करून देण्याचे आश्वासन सरकारने संप काळात दिले होते.

त्याकरिता स्वतंत्र वेगळा निधी देणे गरजेचे असताना त्याचा विसर सरकारला पडला आहे. काही दिवसांपूर्वी शासनाच्या परिपत्रकात जाहीर केलेली, 165 कोटी रुपये ही रक्कम वेतनासाठी अपुरी असून ही रक्कम एसटीच्या खात्यावर अद्यापि वर्ग झालेली नाही.

या मुळे कर्मचाऱ्यांना या महिन्यात सुद्धा वेतन वेळेवर मिळालेले नसून, निधी देण्याच्या बनवाबनवी मुळे या पुढे महामंडळ आर्थिक सक्षम होणार नाही. या पुढे कुठलीही विकासकामे होणार नाहीत. कदाचित डिझल अभावी गाड्या उभ्या राहतील अशीच परिस्थिती असल्याचे एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले.

Leave a Comment