वाहतुकीचा बोजवारा; सांगवीत क्रांती चौकात प्रचंड वाहतूक कोंडी

Photo of author

By Sandhya

रस्ते कॉंक्रिटीकरण सुरु असल्यामुळे सांगवीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते बा. रा. घोलप महाविद्यालय वळणापर्यंत वाहतूक नियोजनाचा अक्षरषः बोजवारा उडाला आहे. रस्त्याच्या कामामुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी वन-वे तयार केला आहे. परंतु, विरुध्द दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे शनी मंदिरमार्गे फेमस चौक ते नवी सांगवीतील क्रांती चौक दरम्यान वाहतूक कोंडी होत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागामार्फत रस्त्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. सांगवीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते बा. रा. घोलप महाविद्यालय येथील रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात येत आहे. जुनी सांगवी, नवी सांगवी, दापोडी, पिंपळे गुरव परिसरातील नागरिक पुणे व चिंचवड, पिंपळे निलख आदी भागांत व त्यापुढे येण्याजाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग करतात. रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे.

औंध व पुढे पुण्यात जाण्यासाठी खासगी, शाळा, महाविद्यालयांच्या बसेसची या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन विद्यार्थी, कामगार, नारिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बेकायदा वाहनतळाकडे पोलिसांचे दुर्लक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते बा. रा. घोलप महाविद्यालय रस्त्याच्या दोन्ही बाजुला बेकायदेशीर वाहने लावली जातात.

त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना रस्ता अपुरा पडत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. अवजड वाहने, खासगी बसथांबे, बेकायदेशीर वाहन तळामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस कर्मचारी देखील कर्तव्यावर नसतात. त्यामुळे नागरिकांची हैराणी होत आहे.

Leave a Comment